F2 रेस जिंकणारा पहिला भारतीय ड्राइव्हर ठरला जेहान दारुवाला


बहरीन – भारताच्या जेहान दारुवाला याने बहरीन येथे पार पडलेल्या फॉर्मुला टू रेसमध्ये इतिहास रचला आहे. जेहान याने साखिर ग्रां. प्री या स्पर्धेत फार्मुला टू रेस जिंकली आहे. जेहान अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला आहे. २२ वर्षीय जेहानने फॉर्मूला टू विजेता मिक शूमाकर आणि डेनिअल टिकटुम यांच्याविरोधातील लढतीत विजय मिळवला.

ग्रीडवर दूसऱ्या क्रमांकाने रेयो रेसिंगसाठी ड्राइव्हिंग करणाऱ्या जेहान याने सुरुवात केली होती. तो आणि डेनियल टिकटुम सोबत होते. जेहानला अनेकदा टिकटुमने साइडला करण्याचा प्रयत्न केला. शूमाकर दोघांच्या लढाईचा फायदा घेत पुढे निघून गेला. जेहानच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्याने आपला स्पीड तात्काळ वाढवला. त्यानंतर जेहान याने दोघांनाही मागे टाकत स्पर्धेच्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. दुसऱ्या क्रमांकावर जपानी युकी सुनोडा राहिला. जेहान आणि युकी यांच्यामध्ये फक्त ३.५ सेकंदाचे अंतर होते. गतविजेता टिकटुम तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. जेहान विजयानंतर म्हणाला की, भारतीयांना मला दाखवून द्यायचे होते की, युरोपीयन ड्राइव्हरसारखी आपल्याकडे संसाधने नसली तरी कठोर मेहनतीच्या बळावर आपण देखील जिंकू शकतो.