आंध्रप्रदेशात विचित्र आजाराने २९२ ग्रस्त; एकाचा मृत्यू


अमरावती: आध्रप्रदेशातील एलुरू भागात एका विचित्र आजाराची लागण तब्बल २९२ जणांना झाली असून त्यापैकी एका ४५ वर्षीय रुग्णाचा विजयवाडा येथील रुग्णालयात रविवारी मृत्यू झाला. या आजाराचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना अचानक चक्कर येऊन त्यांची शुद्ध हरपते. काही उपचारानंतर बहुतेक रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा दिसल्याने त्यांना लगेच घरी जाऊ देण्यात आले. मात्र, ७ जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे.

या रोगावर उपचार करण्यासाठी विशेष पथक एलुरू येथे रवाना करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे या रोगाचे रुग्ण शोधण्यासाठी घरोघरी जाऊन वैद्यकीय पथक पाहणीदेखील करीत आहे. राज्याचे वैद्यकीय विभाग आयुक्त कटमानेनी भास्कर हे देखील एलुरू येथे पोहोचले आहेत. एकीकडे कोरोनाच्या महासाथीचा धोका पूर्णपणे टळलेला नसताना या नव्या रोगाच्या फैलावाने सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे तर वैद्यकीय तज्ज्ञही बुचकळ्यात पडले आहेत.