करबचतीसाठी हा अब्जाधीश दुसऱ्या राज्यात मुक्काम हलविणार  

गेल्या वर्षात करोना काळात सुद्धा वेगाने आर्थिक प्रगती करून जगातील श्रीमंत यादीत दोन नंबरवर झेप घेतलेले टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख एलोन मस्क कर बचत करण्यासाठी दुसऱ्या राज्यात स्थलांतर करण्याचा विचार करत असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्येक देश आपल्या नागरिकांकडून विविध प्रकारे कर वसुली करत असतात. सरकारी करातून सवलती मिळण्यासाठी नागरिक अनेक प्रकारे प्रयत्न करतात. एलोन मस्क सुद्धा त्याला अपवाद राहिलेले नाहीत. त्यातूनच त्यांनी राज्य बदण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

मस्क अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात राहतात. या राज्याच्या रहिवाशांना राज्य कर भरावा लागतो. सीएनबीसीच्या रिपोर्ट नुसार एलोन मस्क यानाही हा कर भरावा लागतो आणि त्यासाठी खुपच मोठी रक्कम चुकवावी लागते. अमेरिकेच्या टेक्सास राज्यात असा कर भरावा लागत नाही. त्यामुळे कॅलिफोर्नियातील मुक्काम हलवून मस्क टेक्सास राज्यात जाण्याचा विचार करत आहेत. त्यामुळे त्यांची अब्जावधी डॉलर्सची बचत होणार आहे. अर्थात या संदर्भात मस्क यांनी अजून पक्का निर्णय घेतलेला नाही.

मे २०२१ मध्ये मस्क यांनी कॅलिफोर्नियातील संपत्ती विकणार असल्याची माहिती दिली होती. त्यात त्यांच्या घराचाही समावेश होता. ब्लूमबर्गच्या यादीनुसार मस्क यांची संपत्ती १४५ अब्ज डॉलर्स असून या वर्षात ११८ अब्ज डॉलर्सने त्यात वाढ झाली आहे.