
चेन्नई – आपला राजकीय पक्ष सुरू करणार असल्याची घोषणा थलैवा अर्थात सुपरस्टार रजनीकांत यांनी केली आहे. रजनीकांत यांनी गुरूवारी ट्विट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर जानेवारी महिन्यापासून त्यांचा राजकीय पक्ष कार्यरत होईल, असेही यावेळी सांगण्यात आलं.
३१ डिसेंबरला करणार राजकीय पक्षाची घोषणा करणार रजनीकांत
यापूर्वी आपला पक्ष रजनी मक्कल मंदरमच्या जिल्हा सचिवांची सोमवारी त्यांनी भेट घेतली होती. त्याचबरोबर आपला राजकीय पक्ष लवकरच सुरू करण्याबाबत माहिती देणार असल्याचे म्हटले होते. त्यांना त्यांच्या समर्थकांनी राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता, ही भेट त्याच वेळी झाली होती.
तामिळनाडूतील वेल्लोर जिल्ह्यात नुकतेच काही पोस्टर्स समोर आले होते. त्यामध्ये रजनीकांत यांना राजकारणापासून लांब राहण्याच्या त्यांच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला होता. दरम्यान, रजनीकांत यांनी चर्चा केल्यानंतरच राजकीय पक्षाचा विचार केला आहे. पुढील वर्षी तामिळनाडूत विधानसभेच्या निवडणुकाही पार पडणार आहेत.
गेल्या दोन वर्षांपासून रजनीकांत राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांनी राजकारणात अधिकृतपणे प्रवेश केलेला नाही. अभिनेता रजनीकांत आणि कमल हासन यांनी गतवर्षी एकत्रित काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. रजनीकांत यांनी गेल्या महिन्यात आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते. तामिळनाडूत रजनीकांत यांच्या नावे असणारे एक पत्र चर्चेचा विषय ठरले होते, डॉक्टरांनी कोरोना काळात प्रचार कऱण्यावरुन रजनीकांत यांच्या प्रकृतीबाबत यामध्ये चिंता व्यक्त केली होती. रजनीकांत यांनी अजिबात प्रवास न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. हे पत्र आपले नसल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले होते. दुसरीकडे हा रणनीतीची भाग असल्याचा दावा भाजप आणि काँग्रेस तसेच स्थानिक पक्षांनी केला होता.
