सर्वसामान्यांसाठी 15 डिसेंबरनंतर सुरु होऊ शकते लोकल सेवा; पण पाळावे लागतील ‘हे’ नियम


मुंबई – मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकलसेवा बंद आहे. पण सध्या लोकल सेवा काही ठराविक वेळेत सुरु असली तरी केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि महिलांनाच त्यातून प्रवास करण्याची मुभा असल्यामुळे लोकल अभावी होणाऱ्या त्रासदायक प्रवासातून सुटका मिळवण्यासाठी लोकलसेवा कधी सुरु होणार याकडे मुंबईतील सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यास प्रशासन लोकल सेवा सुरु करण्याबाबत सकारात्मक पाऊल उचलत असून येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत लोकल सेवा सुरु करण्याची तारीख निश्चित करण्यात येईल.

राज्य, महापालिका, रेल्वे अधिकारी सहभागी 11-12 डिसेंबर रोजी होणाऱ्या या बैठकीत होणार आहेत. त्याचबरोबर प्रशासनाचा 15 डिसेंबर नंतर लोकल सेवा सुरु करण्याचा मानस असून अंतिम निर्णय या बैठकीत घेतला जाईल.शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन लोकल सुरु करण्याबाबत निर्णय या बैठकीत घेण्यात येईल, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले आहे.

दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव जरी नियंत्रणात येत असला तरी तो पुन्हा वाढू नये यासाठी विशेष खबरदारी प्रशासन घेत आहे. तसेच नागरिकांनाही दक्ष राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याचबरोबर रेल्वे प्रवासादरम्यानही मास्क वापरणे, सुरक्षित अंतर राखणे यांसारख्या नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. नियम मोडणाऱ्यांकडून दंड वसुली केली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.