
नवी दिल्ली – नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पण कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबतचे आदेश नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने परिपत्रक जारी करुन दिले आहेत. पण ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत सुरू असलेल्या खास विमानांना या कालावधीत उड्डाणाची परवानगी असेल. तसेच, डीजीसीएकडून परवानगी मिळालेल्या विशेष विमानांवर बंदी नसेल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानसेवा 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा DGCAचा निर्णय
डीजीसीएने यापूर्वी 30 नोव्हेंबरपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवरील बंदी वाढवली होती. यावर्षी 23 मार्चपासून कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे. त्यावेळी देशांतर्गत विमानांवरही बंदी होती, पण देशांतर्गत विमानांना 25 मेपासून पुन्हा परवानगी देण्यात आली. तर, 30 नोव्हेंबरपासून आंतरराष्ट्रीय विमानांची वाहतूक सुरू होण्याची शक्यता होती, पण आता कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यामुळे 31 डिसेंबर 2020 पर्यंत आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार आहे.
