उत्तराखंडात साकारले देशातील पहिले ‘शैवाल उद्यान’


देशातील पहिले शैवाल उद्यान (मॉस गार्डन) उत्तराखंड येथे उभारण्यात आले आहे. कुमाऊं खोऱ्यात १० एकरांमध्ये हे उद्यान साकारण्यात आले आहे. राख्या वन विभागाच्या सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार उभारण्यात आलेल्या या उद्यानाचे उदघाटन मॅगसेसे पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले आहे.

शेवाळाच्या अनेक प्रजातींचे जातं आणि संवर्धन व्हावे, सर्वसामान्य जनतेला त्याची माहिती व्हावी, पर्यावरणातील शेवाळाचे महत्व ध्यानात यावे, या दृष्टीने असे उद्यान विकसित करण्याचा प्रस्ताव विचारात घेण्यात आला. या उद्यानात ३० प्रकारच्या शेवाळ आणि ‘ब्रायोफायटा’ वनस्पतींच्या प्रजाती पाहायला मिळणार आहेत. त्यामध्ये ‘सिमेंट मॉस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुर्मिळ प्रजातीचाही समावेश आहे. ही प्रजाती आंतरराष्ट्रीय पातळीवर अतिदुर्मिळ म्हणून घोषित करण्यात आली आहे.

या उद्यानात १. २ किलोमीटरचा फेरफटका मारताना पर्यटकांना आणि अभ्यासकांना विविध प्रजातीची शेवाळ पाहता येतील तसेच त्यांच्याबद्दलची शास्त्रीय माहितीही फलकाद्वारे वाचता येईल. या उद्यानात एक डायनासोरची प्रतिकृतीही उभारण्यात आली आहे. ज्युरासिक काळापासून शेवाळ अस्तित्वात होते, हे दाखविण्याचा त्यामागचा उद्देश आहे. जपानमध्ये लोकप्रिय असलेले शेवाळापासून बनवलेले दागिने, जीवाणूंपासून संरक्षणासाठी आणि तापमान नियंत्रित करण्यासाठी पक्ष्यांकडून घरटे बांधताना करण्यात येणार शेवाळाचा वापर या बाबीही उद्यानात दर्शविण्यात आल्या आहेत. याशिवाय शेवाळांचा उल्लेख असलेल्या कविता आणि चित्रही या उद्यानात पाहायला मिळणार आहेत.