पुण्यात मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडले दोन हजार वर्षांपूर्वीचे अवाढव्य हाडांचे अवशेष


पुणे – मेट्रोच्या मार्गाचे पुण्यामध्ये स्वारगेट ते शिवाजीनगर या मार्गावर खोदकाम सुरु असून मंडई परिसरामध्ये याच खोदकामादरम्यान अज्ञात प्राण्याचे प्रचंड मोठ्या आकाराचे अवशेष आढळून आले आहे. किमान दोन हजार वर्षांपूर्वीचे हे अवशेष असावेत असा अंदाज पुरातत्व विभागातील संशोधकांनी व्यक्त केला आहे. या अवशेषांचा काळ चाचण्या आणि संशोधनानंतर शोधता आल्यास यापूर्वी पुण्याचा कधीच समोर न आलेल्या पुरातन इतिहासावर प्रकाश टाकता येईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. कामगारांनी बुधवारी हे खोदकाम सुरु केल्यानंतर प्राण्यांची हाडे अवघ्या दहा मीटर अंतरापासून सापडू लागल्यानंतर काळजीपूर्वक खोदकाम करत कामगारांनी अनेक अवशेष बाहेर काढले.

सामान्य प्राण्यांच्या सांगाड्यातील हाडांपेक्षा मोठा मंडई येथे सापडलेल्या हाडांचा आकार आहे. प्रथम दर्शनी ही हाडे हत्तीची असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ही हाडे ज्या ठिकाणी सापडली, त्या खोदकामाच्या ठिकाणाला पुरातत्व खात्यामधील जाणकार आणि इतिहास संशोधकांनी आज भेट दिली. या हाडांचा सखोल अभ्यास केल्यानंतरच त्यामागील रहस्य उलगडण्यास मदत होईल, असे सांगितले जात आहे.

काही इतिहास तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार सध्याचा मंडई परिसर हा दोनशे वर्षांपूर्वी मैदानी भाग होता. सर्कशीचे तंबू येथे लावले जायचे. त्यामुळे या हाडांचे नक्की वय काय आहे, ती कधीपासून येथे आहेत याचा शोध लागल्यानंतरच हाडांबद्दल ठोसपणे सांगता येईल, असे सांगण्यात येत आहे. ही हाडे सध्या तरी पुरातत्वविभागाकडे सोपवण्यात आली असली तरी मेट्रोच्या खोदकामादरम्यान सापडलेल्या या हाडांच्या आकारामुळे या हाडाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.