चंद्रकांत पाटील यांनी सांगितली मनसेशी युती करण्यासंदर्भातील महत्त्वाची अट


मुंबई: राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी 2022 मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार तयारी सुरू केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यंदा महापालिकेवर भाजपचाच भगवा फडकेल, अशी गर्जना केल्यानंतर शिवसेनेने त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबतच्या युतीबद्दल विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते प्रविण दरेकर यांनी उत्सुकता वाढवणारे वक्तव्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मनसेसोबतच्या युतीबद्दल पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे.

काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांना मनसेसोबतच्या युतीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जनतेच्या प्रश्नांवर राज ठाकरे हे तळमळीने रिऍक्ट होतात. पण ते आमचे परप्रांतियांबाबतचे धोरण स्वीकारणार नाहीत. त्यांचे धोरण त्यांनी बदलायला हवे. परप्रांतियांबाबतची भूमिका त्यांनी बदलल्याशिवाय मनसेशी युती होऊ शकत नाही, असे पाटील म्हणाले. मराठी माणसाला नोकऱ्या मिळायलाच हव्यात. त्याबदल दुमत नाही, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले.

तत्पूर्वी प्रविण दरेकर यांना मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेसोबत युती होणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आजतरी भाजप स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. पण निवडणुकीच्या वेळी निर्णय घेऊ, असे सांगत त्यांनी आगामी काळात मनसे-भाजप युती होईल का? याची उत्सुकता कायम ठेवली आहे.

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना प्रविण दरेकर यांच्या प्रतिक्रियेनंतर भाजपसोबत युती करणार का, असा प्रश्न विचारण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे त्यावर विचार करतील. राज साहेबांनी विचार करायला प्रविण दरेकर आता फारच मोठा झाला असल्याचा टोला देखील नांदगावकर यांनी लगावला. दरेकर आधी मनसेत होते. मनसेकडूनच ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर २०१४ मध्ये मागाठाणे मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला.

भाजपकडून रणनीती आखण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक आयोजित केली होती, या बैठकीत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. आगामी महापालिकेत भाजपचा भगवा झेंडा फडकेल, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला होता.