गोपीचंद पडळकर यांची शरद पवारांवर नाव न घेता टीका


सांगली: लोकसभेत ज्या पक्षाचे चारच खासदार निवडून येतात, त्यांना तुम्ही लोकनेते म्हणता, मग 303 खासदारांना निवडुन आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणाल, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी उपस्थित केला आहे. मोदींवर तुम्ही टीका करता, मग तुमच्यावर आम्ही टीका केली, तर एवढा त्रागा का करता, असे म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाचे भाजप उमेदवार संग्राम देशमुख यांचा प्रचारासाठी सांगलीमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता. पडळकर त्या मेळाव्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलत होते. 4 खासदार ज्या पक्षाचे निवडून येतात, त्यांना तुम्ही लोकनेते म्हणता, मग 303 खासदार निवडून आणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणाल, मोदींवर तुम्ही टीका करता, मग तुमच्यावर आम्ही टीका केली तर एवढा त्रागा का करता, अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केली आहे. भ्रष्टाचाराविरोधातील आणि प्रखर जातीयवाद्यांच्या विरोधातील पदवीधरची निवडणूक आहे. या टग्यांच्या सरकारच्या विरोधातील ही निवडणूक आहे, अशी टीका त्यांनी ठाकरे सरकारवर केली आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. महाविकास आघाडीचे नेते चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर त्यांच्यावर खरपूस टीका करत सुटले आहेत. चंद्रकांत पाटलांनी पुण्यातील एका मेळाव्यात शरद पवारांवर टीका केली होती. राजकारणात येण्यापूर्वी शरद पवार मला खूप मोठे नेते वाटायचे. पण राजकारणात आल्यावर ते खूप छोटे नेते असल्याचे दिसून आले. त्यांचा अभ्यास नसतो, अशी टीका शनिवारी चंद्रकांत पाटील यांनी एका मेळाव्यात केली होती. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते असल्याचेही पाटील म्हणाले होते. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी यावरून त्यांच्यावर चांगलीच तोफ डागली होती.

त्यानंतर त्यावर सारवासारव करण्याचाही चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केला होता. शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्याबद्दल कायम चांगले बोलत आलो आहे.आरक्षणासाठीच्या कायदेशीर बाबींविषयी मी काही गोष्टी बोललो. शरद पवार यांचा अनादर करण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. शरद पवारांबद्दल मला चुकीचे बोलायचे नव्हते. पण तुम्ही मोदींवर, शाहांवर बोलता ते चालते. देवेंद्र फडणवीस यांना टरबुज्या म्हणता ते चालतं, मला चंपा म्हणतात ते चालते का?,’ असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला होता.