
पुणे – सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची नावे लिहित राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजाऱ्याने आत्महत्या केली आहे. पण यामुळे आता खळबळ माजली आहे. या संदर्भात बारामती पोलीस ठाण्यात मृत व्यक्तीच्या मुलाने तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणात ६ जणांना पोलिसांनी अटक केली आहे तर अद्याप ३ जण फरार आहे.
सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादी नेत्यांची नावे लिहित अजित पवारांच्या शेजाऱ्याने केली आत्महत्या
याबाबत माहिती देताना बारामतीतील पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले की, व्यापारी प्रीतम शहा यांनी आत्महत्या केली, पण सुसाईड नोटमध्ये त्यांनी अवैध सावकारीवरुन काहीजण पैशांसाठी छळ करत असल्याचे म्हणत मी आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये व्यापाऱ्याने लिहिले आहे. पोलिसांनी या प्रकरणात व्यापारी प्रीतम शहा यांच्या मुलाच्या तक्रारीवरुन गुन्हा नोंदवला आहे.
प्रीतम शहा यांच्या मुलाने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, नगरसेवक जयसिंह अशोक देशमुख, कुणाल काळे, संजय काटे, विकास धनके, प्रविण गालिंदे, हनुमंत गवळी, सनी उर्फ सुनील आवळे, संघर्ष गव्हाले, मंगेश आमसे यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. यातील एकजण बारामती बाजार समितीचे माजी अध्यक्ष आहेत, बहुतांश आरोपी राजकीय क्षेत्राशी संबंधित असून आरोपींमध्ये बारामतीचे नगरसेवक, बारामती सहकारी बँकेचे संचालकांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी नगरसेवकासह ९ जणांविरोधात बारामती पोलिसांनी सावकारीच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या ९ पैकी ६ आरोपींना अटक केली आहे. पण बारामती शहरात या घटनेमुळे खळबळ माजली आहे. ३० टक्के व्याजदराने आरोपींनी प्रीतम शहा यांना पैसे दिले होते. प्रीतम शहा यांनी घेतलेले पैसे परतही केले, पण जादा रक्कम वसुलीसाठी प्रीतम शहा यांच्या मागे आरोपींनी तगादा लावला होता. त्यामुळे कंटाळून प्रीतम शहा यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.
दरम्यान, भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. अर्णब गोस्वामी यांना जो निकष लावून अटक केली, तोच निकष लावून या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर आता कारवाई करा, झेपेल काय? असा सवाल भातखळकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
