अमृता फडणवीसांच्या गाण्याचे यशोमती ठाकूर यांच्याकडून कौतुक


मुंबई – भाऊबीजेच्या दिवशी विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पोस्ट केलेल्या गाण्याला तुफान प्रतिसाद मिळाल्याचे सांगत, आपण पुन्हा नवीन कलाकृती घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे म्हटले आहे. स्त्रियांना अमृता यांनी समर्पित केलेल्या या गाण्यामध्ये दिवाळीच्या शुभेच्छा देताना त्यांनी स्त्री शक्तीचे महत्व पटवून दिले आहे. पण या गाण्याला पसंती मिळत असल्याचे अमृता यांनी म्हटलेले असतानाच टी-सिरीजच्या युट्यूब चॅनेलवर या गाण्याला लाईकपेक्षा डिस्लाइक जास्त आहेत. असे असले तरी गाण्याचा आशय चांगला असल्याचे म्हणत ठाकरे सरकारमधील मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांच्या गाण्याचे कौतुक केले आहे.


सध्या विविध कारणांमुळे अमृता फडणवीस यांचं हे गाणं व्हायरल होत आहे. गाण्याचा आशय छान आहे. मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. माझ्या शुभेच्छा, असे म्हणत यशोमती ठाकूर यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या गाण्याचे कौतुक केले आहे.

राजकारणापासून अमृता फडणवीस या जरी अलिप्त असल्या तरी त्या राज्यातील आणि देशातील वेगवेगळ्या मुद्यांवर भूमिका मांडतात. त्याचबरोबर त्या अनेकवेळा चर्चेतही आल्या. अमृता फडणवीस यांनी काल जागतिक पुरूष दिनाचे निमित्त साधत एक ट्विट केले होते. आज आंतरराष्ट्रीय पुरूष दिवस आहे आणि जागतिक शौचालय दिनही आहे. यानिमित्ताने मी देशातील सर्व पुरुषांना एक सर्वसामान्य स्त्री म्हणून आवाहन करते की, आपण सगळ्यांनी एकत्र येऊन वाईट विचारांच्या काही मोजक्या नॉटी पुरूषांच्या आचार विचारांची घाण फ्लश करून महाराष्ट्र स्वच्छ करण्यासाठी मदत करावी, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचा नामोल्लेख न करता त्यांना अप्रत्यक्षरित्या टोला लगावला होता.