
मुंबई : लवकरच कोरोना संकटातून मुक्तता होण्याची आहे. कारण कोरोना लसीची प्रतीक्षा संपणार आहे. सर्वसामान्यांसाठी कोरोना व्हायरसवरील लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पण सध्याच्या घडीला प्रत्येकाच्या मनात सतत हा प्रश्न निर्माण होत आहे की या लसीसाठी आपल्याला किती पैसे मोजावे लागतील? सर्वसामान्यांसाठी नेमकी कधी ही लस उपलब्ध होईल? ऑक्सफोर्डच्या कोरोना लसीची अॅस्ट्रेजेनिकासोबत चाचणी करणाऱ्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी भारतात कोरोनाच्या लसची किंमत 500 ते 600 रुपयांच्या दरम्यान असेल, असे सांगितले आहे .
लवकरच संपणार प्रतिक्षा; सीरम इन्स्टिट्युटच्या कोरोना लसीची एवढी असेल किंमत
पूनावाला यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितलं की, ऑक्सफोर्डच्या कोरोना प्रतिबंधक लसीचे सुमारे 30 ते 40 कोटी डोस 2021 च्या पहिल्या तिमाहीत उपलब्ध होतील. सामान्य लोकांना या लसीसाठी 500 ते 600 रुपये द्यावे लागतील. भारत सरकारला ही लस स्वस्त दरात दिली जाईल. त्याचबरोबर आमची प्राथमिकता भारत असल्याचे अदर पुनावाला यांनी म्हटले आहे.
सोमवारी अमेरिकन औषध निर्माता कंपनी मोडेर्नाने जाहीर केले की आमची कोरोना प्रतिबंधक लस 94.5 टक्के प्रभावी आहे. यापूर्वी, अमेरिका आणि जर्मनी यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या फायझर (Pfizer) आणि बायोएनटेक यांनी देखील अशीच घोषणा केली होती. या दोन्ही लसींची तिसरा टप्प्यातील चाचणी दरम्यान चांगला निकाल लागला आहे आणि नियामकाच्या मान्यतेनंतर, लोकांना लस डोस देण्याचे काम डिसेंबरमध्ये सुरू केले जाऊ शकते.
मॉडर्ना आणि फायझर-बायोटेक या दोन कंपन्य़ांनी तिसर्या टप्प्यातील चाचणीदरम्यान मोठ्या प्रमाणात निकाल यशस्वी झाल्याची घोषणा केली आहे. तर सध्या किमान 10 कंपन्यांच्या लसींची चाचणी अंतिम टप्प्यात आहे. फायझरचा अभ्यास करणार्या स्वतंत्र पॅनेलने सांगितले की कोविड 19 रोखण्यासाठी ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे आढळले आहे. असाच एक अभ्यास मॉडेर्नावर घेण्यात आला आणि त्यात ही लस 94.5 टक्के प्रभावी असल्याचे आढळले. यूएस फूड अॅण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनच्या (एफडीए) बेंचमार्क अंतर्गत मंजुरीसाठी 50 टक्के प्रभावी असणे आवश्यक आहे. म्हणून दोन्ही लसींना नियामक मंजुरी मिळणे जवळपास निश्चित मानले जात आहे.
भारतात फायझर लसीची साठवणूक करणे ही सर्वात मोठे आव्हान ठरू शकते. 70 डिग्री तापमानात फायझरची लस साठवावी आणि वाहतूक करावी लागेल. याव्यतिरिक्त ही लस 5 दिवस फ्रिजमध्ये ठेवली जाऊ शकते. तसेच तीन आठवड्यांच्या आत या लसीचा दुसरा डोस घ्यावा लागेल.
भारतासाठी मॉडर्नाची लस योग्य म्हणता येईल. या लसीला स्टोरेज आणि वाहतुकीसाठी -20 डिग्री तपमान आवश्यक आहे. तर 30 दिवसांपर्यंत ही लस रेफ्रिजरेटर तापमानात ठेवली जाऊ शकते. ही लस 12 तास घरातील सामान्य तापमानावर देखील ठेवली जाऊ शकते. तर या लसीचा दुसरा डोस चार आठवड्यांच्या फरकांनी घ्यावा लागेल.
