जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत आयसीसीने घेतला मोठा निर्णय


मुंबई : जागतिक कसोटी चॅम्पियनशिपबाबत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना महामारीमुळे गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या संघांचा निर्णय घेतला जाईल, असे आयसीसीने सांगितले. भारतीय संघाचे आयसीसीच्या या निर्णयामुळे मोठे नुकसान झाले आहे, तर अव्वल स्थानावर ऑस्ट्रेलियाचा संघ पोहोचला आहे.

अटी बदलण्यासाठी अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखालील आयसीसी क्रिकेट समितीने केलेल्या शिफारशीला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्याने संघाच्या गुणांची मोजणी होणार आहे. आयसीसीने जारी केलेल्या नव्या क्रमावारीनुसार भारतीय संघ दुसऱ्या स्थानावर आहे, कारण ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी 82.2 आहे, जी भारताच्या 75 टक्क्यांपेक्षा फारच जास्त आहे. संघांना सामन्यात मिळालेल्या विजयाच्या गुणांची टक्केवारी आयसीसीने काढली आहे. ज्या मालिका कोरोना महामारीमुळे झाल्या नाहीत त्या अनिर्णित समजल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला आयसीसीच्या या नियमामुळे फायदा झाला आहे. तर भारताचे नुकसान झाले आहे.

भारतीय संघाचे आतापर्यंत चार मालिकांमध्ये 360 गुण आहेत आणि बदललेल्या नियमाच्या आधी भारतीय संघ क्रमवारीत प्रथम क्रमांकावर होता. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तीन मालिकेमधील 296 गुणांसह दुसऱ्या स्थानावर होता. परंतु गुणांच्या टक्केवारीच्या आधारावर ऑस्ट्रेलियाचा संघ अव्वल स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडचा संघ या क्रमवारीत 60.8 टक्क्यांसह भारतानंतर तिसऱ्या स्थानावर आहे. आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारताला चांगली कामगिरी करावी लागणार आहे, कारण आता इतर संघांकडेही वरच्या क्रमांकावर जाण्याची संधी आहे. तर भारताविरुद्ध मायदेशी होणाऱ्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला फायदा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 2022 मध्ये होणारा महिला टी-20 विश्वचषकही पुढे ढकलण्यात आला आहे. ही स्पर्धा आता 2023 मध्ये प्रस्तावित आहे. आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2023 मध्ये 9 ते 26 फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येणार आहे.