नवी दिल्ली: पेट्रोल नियंत्रणमुक्त झाल्याच्या संधीचा फायदा घेत देशातील तेलकंपन्यांनी गेल्या काही आठवड्यात दुसर्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. यावेळी करण्यात आलेली वाढ प्रतिलिटर १ रु. ४० पैसे इतकी आहे.
कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढल्याने ही वाढ करणे गरजेचे बनले होते असे इंडियन ऑईल कंपनीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे. १ रु. ४० पैशाची ही वाढ निव्वळ स्वरूपाची आहे. त्यात सेल्स टॅक्स आणि व्हॅट याचा समावेश केला तर ती वाढ यापेक्षा अधिक होणार असून आज मध्यरात्रीपासून हे दर लागू होणार आहेत. या आधीची वाढ १६ फेब्रुवारीला करण्यात आली. त्यावेळी हे दर प्रतिलिटर दीड रुपयानी वाढवण्यात आले.
नव्या दरवाढीनुसार दिल्लीत पेट्रोलचे दर १ रु. ६८ पैशांनी वाढणार असून तेथील पेट्रोलचा भाव आता ७० रु. ७४ पैसे इतका झाला आहे. भारताला आज कच्चे तेल विदेशातून आयात करावे लागते. डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरली की आयातीवरील खर्चही वाढतो. गेल्या काही दिवसात आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाच्या किमती प्रति बॅरल १२८ डॉलर्सवरून १३१ डॉलर्स इतक्या झाल्या आहेत तर याच काळात डॉलरची किंमत ५३ रु. ४३ पैशावरून ५४ रु. १५ पैसे इतकी झाली आहे.
या निर्णयामुळे मुंबईतील पेट्रोलचा दर ७५ रु. ८९ पैशावरून ७७ रु. ६६ पैसे इतका झाला आहे. पेट्रोलच्या किमती वाढवण्यात आल्या असल्या तरी तेल कंपन्यांना आजही डिझेल ११ रु. २६ पैसे प्रतिलिटर इतक्या तोट्यात विकावे लागत आहे. इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला डिझेल, केरोसीन आणि गॅसच्या विक्रीत ८६ हजार ५०० कोटी रुपये इतका मोठा तोटा या वर्षात स्वीकारावा लागला आहे.