कॉमेडी अँड रोमान्स? नो, नाय, नेव्हरः रामू

नवी दिल्ली: निःशब्द सारखी सुंदर प्रेमकथा रूपेरी पडद्यावर साकारणार्‍या प्रसिद्ध दिग्दर्शक रामगोपाल वर्माने मानवी स्वभावातील नकारात्मक बाजू आपल्याला जास्त आकर्षित करत असल्यामुळे बॉलीवूडमधील टिपिकल रोमान्स आणि विनोदी चित्रपट बनविणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

‘द अटॅक्स ऑफ 26/11’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्याचे चित्र मांडणारा हा प्रतिभावान दिग्दर्शक म्हणाला की; प्रेमामधील निरागसता आता संपली आहे. त्यामुळे मानवी मनाची गुंतागुंत, बंडखोर वृत्ती मला अधिक आकर्षित करते.

प्रेमकथेपेक्षा मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबवर चित्रपट बनविण्यात मला अधिक रस आहे. मी कधीही प्रेमकथा किंवा विनोदी चित्रपट बनवू शकणार नाही; असे रामूने नमूद केले.

‘सत्या’, ‘रंगीला’, ‘कंपनी’, ‘सरकार’ या त्याच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर दणदणीत यश मिळविले होते. तथापि, त्याचेच दिग्दर्शन लाभलेल्या ‘रक्तचंदन’, ‘डिपार्टमेंट’ने मात्र दणकून मार खाल्ला होता.

Leave a Comment