मुंबई: अन्न व औषध प्रशासनाच्या धोरणांविरोधात राज्यातील औषध विक्रेत्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जोरदार विरोध केला आहे. औषध विक्रेत्यांनी आंदोलन थांबवावे अन्यथा मनसे पद्धतीने ते मोडीत काढण्यात येईल; असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
दुकानांमध्ये प्रशिक्षित फार्मासिस्टची उपस्थिती बंधनकारक करणार्या एफडीएच्या नियमाविरोधात औषध विक्रेत्यांनी आठ तास काम आंदोलन पुकारले आहे. संध्याकाळी सहा वाजता औषधी दुकाने बंद करण्याचे आंदोलन सुरू आहे. सरकारने येत्या दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास संपूर्ण बंद पुकारला येईल; असा इशारा केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिला आहे.
या आंदोलनामुळे राज्यातील रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. औषधाअभावी काही रुग्णांच्या जीवावरही बेतू शकते; असे राज ठाकरे यांनी सांगून एफडीएला पाठिंबा दर्शविला आहे. याबाबत मनसे कामगार सेनेचे पदाधिकारी एफडीए आयुक्तांना भेटणार आहेत.