ब्लॅकबेरीचा स्मार्टफोन २५ फेब्रुवारीला भारतीय बाजारात

नवी दिल्ली: ब्लॅकबेरी त्यांचे नवे स्मार्टफोन झेड १० आणि क्यू १० येत्या २५ फेब्रुवारीला भारतीय बाजारपेठेत सादर करणार असल्याचे कॅनडातील कंपनीने जाहीर केले असून या फोनच्या भारतीय बाजारातील किंमती अद्याप जाहीर करण्यात आलेल्या नाहीत. मुंबईत हे फोन प्रथम उपलब्ध करून देण्यात येणार आहेत असे समजते.

नवीन ऑपरेटिग सिस्टीमसह असलेले हे फोन गेल्या महिन्यात प्रथम ब्रिटनच्या बाजारात आले होते. त्यानंतर ते कॅनडा, यूएई आणि नंतर यूएसएच्या बाजारात दाखल झाले होते. हे फोन अ‍ॅपलच्या स्मार्टफोनना कडवी टक्कर देतील तसेच गुगल अँड्रॅईड सिस्टीम वापरणार्‍या अन्य कंपन्यांच्या स्माटफोनशी स्पर्धा करतील असे कंपनी प्रवक्तयाचे म्हणणे आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार भारतीय बाजारपेठेत विशेषतः तरूण वर्गात ब्लॅकबेरी उत्पादनांची क्रेझ अधिक आहे व त्यामुळे या फोनना भारतात चांगली लोकप्रियता मिळेल असा कंपनीचा अंदाज आहे.