दहशतवाद विरोधी पथकाकडे ४० हून अधिक कॉल

मुंबई: दहशतवादी संघटना इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या यासीन भटकळ आणि त्याच्या साथीदारांची माहिती देणार्‍यांना दहशतवाद विरोधी पथकाने जाहीर केलेल्या १० लाख रूपयांच्या पारितोषिकानंतर या विभागाकडे आठवड्याच्या कालावधीत ४० हून अधिक दूरध्वनी आले असल्याचे या विभागातील अधिकार्‍यांनी सांगितले.या प्रत्येक कॉलची दखल दहशतवाद विरोधी पथकाने घेतली असल्याचेही त्यांनी सांगितले.

इंडियन मुजाहिद्दीनचा म्होरक्या आणि देशातील अनेक बॉम्बस्फोट तसेच दहशतवादी हल्ल्यात सामील असलेला यासीन भटकळ आणि त्याचे साथीदार तहसीन अख्तर, वासीम शेख, असदुल्ला जावेद यांच्याविषययी माहिती दिल्यास संबंधितांना १० लाख रूपयांचे पारितोषिक देण्यात येणार असल्याचे दहशतवाद विरोधी पथकाने १२ फेब्रुवारीला जाहीर केले होते. त्यानंतर देशभरातून सुमारे ४० कॉल आले असून कॉल करणार्‍यांनी वरील दहशतवादयांशी साधर्म्य असलेल्या व्यक्ती बस स्टॉप, रेल्वे स्टेशन व बसमध्ये दिसल्याचे कळविले आहे. या शिवाय आलेल्या अन्य ६० कॉलमध्ये नागरिकांनी एटीएस ने दिलेल्या नंबरची खात्री करून घेण्यासाठी कॉल केले आहेत असेही समजते.

पुण्यातून एका व्यक्तीने कॉल करून असदुल्ला अख्तर जावेदला कांही दिवसांपूर्वी पाहिल्याचे सांगितल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने त्वरीत संबंधित व्यक्तीची भेट घेऊन त्याच्याकडून अधिक माहिती घेतली असल्याचेही अधिकाऱ्यानी सांगितले.

Leave a Comment