अहमदाबाद: साबरमती कारागृहातून फरार होण्यासाठी इंडियन मुजाहिदीनच्या १४ अतिरेक्यांनी १८ फूट लांब भुयार खोदल्याचा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून हे भुयार खोदले जात होते. कारागृहाच्या कर्मचार्यांनी रंगेहाथ पकडल्याने त्यांचा डाव उधळला गेला.
सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असलेल्या साबरमती कारागृहातील या प्रकाराने कारागृहाच्या सुरक्षेचेही वाभाडे निघाले आहेत. अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपींच्या बराकीजवळच हे भुयार खोदण्यात आले आहे. भुयार १८ फूट लांब तर चार फूट रुंद आहे.
इंडियन मुजाहिदीनने २००८ मध्ये अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट घडवले होते. त्यात ५० जण ठार झाले. या स्फोटांप्रकरणी अटक करण्यात आलेल्या १४ अतिरेक्यांना साबरमती कारगृहात ठेवण्यात आले आहे. यातील काही अतिरेकी सिव्हील इंजिनियरही आहेत. त्यांनी जेवणासाठी देण्यात येणार्या भांड्यांचा वापर भुयार खोदण्यासाठी केला.
या अतिरेक्यांना इतर कैद्यांबरोबर दररोज तीन तास बागकाम करायला नेले जायचे. त्याचाच फायदा उठवंत त्यांनी भुयार खोदले. गंभीर बाब म्हणजे गेले पाच ते सहा महिन्यांपासून हे भुयार खोदले जात होते तरीही कोणाला हे कळू शकले नाही. हे भुयार खोदण्यासाठी कारागृहातील कोणी अधिकारी वा कर्मचारी या अतिरेक्यांना मदत करत होता का; याच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
साबरमती कारागृहाची क्षमता २ हजार ८०० कैद्यांची असून कारागृहात सध्या ३ हजार ७०० कैदी आहेत.