शाही स्नानादरम्यान मरण पावलेल्यांची संख्या ३८ वर

अलाहाबाद – अलाहाबादमध्ये रविवारी झालेली चेंगराचेंगरी ही पाटण्याला जाणारी रेल्वे पकडण्याच्या नादात झाली आहे, असा दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केला आहे.रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेल्या दृश्यांमधून ही गोष्ट समोर आली आहे. याबाबत बोलताना अखिलेश यादव यांनी सांगितले की, यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा ३६ वर पोहोचला आहे. स्नान करताना झालेल्या चेंगराचेंगरीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक भाविक गंभीर जखमी असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कुंभमेळ्यादरम्यान अलाहाबाद स्थानकावर दोन वेळा चेंगराचेंगरी झाल्याची माहिती रेल्वेच्या सूत्रांनी दिली. आधी फुटओव्हर ब्रिजवर एकदा चेंदागचेंगरी झाली. त्यानंतर लगेच दुसर्‍यांदा जिन्याच्या पायर्‍यांवर चेंगराचेंगरी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघाताची जबाबदारी नेमकी कोण घेणार यावरून आता राजकारण सुरु झाले आहे. कारण प्रत्येकजण या अपघाताची जबाबदारी दुसर्‍यावर ढकलत आहेत.

या अपघाताची तीन वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. त्यातील पहिले कारण आहे ते पोलिसांच्या लाठीमाराचे; असे चित्र समोर येत आहे. या लाठीमारामुळेच चेंगराचेंगरी झाल्याचा दावा काही भाविकांनी केला आहे. शिवाय अती गर्दीमुळे लाठीमाराचे आदेश दिले होते; अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

दुसरी शक्यता होती ती रेल्वेच्या पुलाचा कठडा तुटल्याने प्रवाशांचा तोल गेल्याची! मात्र असा कोणताच कठडा तुटला नसल्याचे रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी सांगितले आहे.
तिसरे कारण हे कुंभमेळ्यातील अतिगर्दीचे! पाटणा एक्स्प्रेस थांबल्यानंतर बाहेर पडताना काही लोकांनी वृद्ध व्यक्तींना धक्का दिला आणि चेंगराचेंगरी सुरु झाली; असे सांगण्यात येते आहे. मात्र यातील कोणत्याही कारणावर कोणीही ठाम होत नाही. त्यामुळे चेंगराचेंगरीचे नेमके करण काय; याबद्दल संदिग्धता कायम आहे.

अलाहाबाद रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीची नैतिक जबाबदारी स्वीकारत उत्तर प्रदेश सरकारमधील ग्रामीण विकासमंत्री आझम खान यांनी सोमवारी महाकुंभमेळ्याच्या संयोजन समितीच्या समन्वयकपदाचा राजीनामा दिला. आझम खान समाजवादी पक्षातील वरिष्ठ नेते असून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय समजले जातात.

Leave a Comment