नवी दिल्ली: पक्षश्रेष्ठीना उमेदवार निवडीचे सर्वाधिकार देण्याचा एक ओळीचा ठराव करून दिल्लीतूनच सर्व तिकीटवाटप करण्याची काँग्रेसची आजवरची पद्धत आता रद्द होण्याची शक्यता आहे. उमेदवार ‘वरून’ लादण्याबाबत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर काँग्रेसचे नवे उपाध्यक्ष राहुल गांधी हे आता तिकीट वाटपाची ही पद्धत बदलण्याच्या तयारीत आहेत. उमेदवार निवडीचे अधिकार आता स्थानिक पातळीवरील समित्यांकडेच सोपवले जाणार असल्याचे संकेत आहेत. या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी येत्या 15 फेब्रुवारीला दिल्लीत प्रदेश काँग्रेस समित्यांचे अध्यक्ष आणि विधिमंडळ काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे.
ही बैठक दिवसभर चालेल. नजिकच्या काळात नऊ राज्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. काँग्रेसचे जयपूरला जे शिबीर झाले होते त्यात ‘वरून’ होणार्या तिकीट वाटपाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्या अनुषंगाने पक्षाच्या जयपूर जाहीरनाम्यातंच तिकीटवाटपाच्या पद्धतीत बदल करण्याचे संकेत देण्यात आले. त्या अनुषंगाने राहुल गांधी आता पक्षात तशी उपाययोजना करणार असल्याचे सांगितले जात आहे.
पक्षाचे पदाधिकारी आणि महत्त्वाच्या जबाबदार्या असणार्या कार्यकर्त्यांच्या कामकाजाचा नियमित स्वरूपात आढावा घेण्याची यंत्रणाही आता पक्षात कार्यान्वित केली जाणार आहे. विशिष्ठ उमेदवारासाठी एखादा पक्षाचा ज्येष्ठ नेता शिफारस करीत असेल तर त्याच्या जय-पराजयाची जबाबदारीही आता त्याच्यावरच सोपवली जाणार आहे. निवडणूक जिंकण्याची क्षमता हाच आता पक्षाचा एकमेव निकष असणार नाही. त्यासाठी आता संबंधिताची पक्षनिष्ठाही तपासली जाणार आहे आणि जयपूर जाहीरनाम्यातही तसा उल्लेख आहे.