‘रुद्र’ लढाऊ हेलिकॉप्टर लष्करात दाखल

बंगळूरू: संपूर्ण भारतीय बनावटीचे पहिले लढाऊ हेलिकॉप्टर ‘रुद्र’ लष्कराच्या ताफ्यात दाखल झाले. रुद्राच्या समावेशाने भारतीय लष्कराची मारक क्षमता उल्लेखनीय प्रमाणात वाढणार आहे.

रुद्र हे हेलिकॉप्टर हिंदुस्थान एरोनोटिक्सने विकसित केले आहे. एकूण ६० रुद्र हेलिकॉप्टर लष्कर खरेदी करणार आहे. रुद्र हे सर्व प्रकारच्या युद्धात उपयुक्त ठरणार असून जमिनीवरील कारवाईला हवेतून सहकार्य करण्यासाठी ते प्रभावी ठरेल.

रुद्रच्या समावेशाने आमच्या शक्तीत उल्लेखनीय वाढ झाली असून रुद्रची एकून सहा स्क्वाड्रन स्थापन करण्यात येणार आहेत. त्यापैकी पहिले स्क्वाड्रन लवकरंच कार्यान्वित होईल; असे लेफ़्टनंट जनरल नरेंद्र सिंह यांनी सांगितले.

क्षेपणास्त्र आणि मोठ्या मशीनगनचा मारा करण्याची क्षमता असलेल्या रुद्रचे नियंत्रण लष्कराकडे असावे की हवाई दलाकडे; यावरून काही वाद झाला होता. मात्र संरक्षण विभागाने रुद्र लष्कराकडे करण्याचा निर्णय घेतला आहे.