पुणे दि. ७- शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राज्यव्यापी दौर्या नंतर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेही १० फेब्रुवारीपासून आपल्या राज्यव्यापी दौर्यायची सुरवात सातारा येथून करणार आहेत. मात्र तत्पूर्वी पुण्यात येऊन ते येथील ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती करणार आहेत आणि दगडूशेठ हलवाई गणपतीचे आशीर्वादही घेणार आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे. मनसेच्या स्थापनादिवशी ९ तारीख होती. त्यामुळे राज यांचा दौरा १० पासून सुरू होणार असला तरी त्यापूर्वी ९ तारखेचे महत्त्व लक्षात घेऊन ते पुण्यात देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी येणार आहेत असे सांगितले जात आहे.
राज राज्याच्या ३० जिल्ह्यात हा दौरा करणार असून त्याची सांगता ७ मार्चला जळगांव येथील कार्यक्रमाने होणार आहे. या दौर्यारत राज पक्षाचे पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्या बैठका, भेटीगाठी घेणार आहेत आणि जिल्ह्यातील वातावरणाचा अंदाजही घेणार आहेत. कांही ठिकाणी त्यांच्या जाहीर सभाही आयोजल्या गेल्या आहेत.
या काळात राज ठाकरे मंदिरे आणि प्रार्थनास्थळांनाही भेटी देणार असून त्यात तुळजापूर भवानीमाता, शेगांवचे गजानन महाराज संस्थान, नांदेड गुरूद्वारा अशा कांही भेटी देणार आहेत. आगामी विधानसभा निवडणूकींच्या तयारीसाठीच हा दौरा आहे. पुण्यातून निघाल्यानंतर ते पुन्हा पुण्यात येणार नसल्याने येथील कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भव्य रॅलीचे आयेाजन करण्याचे ठरविले असल्याचेही समजते.