अमेरिकेतील पोस्टल सेवा तोट्यात – शनिवारी पत्रवाटप नाही

वॉशिग्टन दि. ७ – अमेरिकेसारख्या धनाढ्य देशातील पोस्ट सेवाही गेली कांही वर्षे आर्थिक संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे खर्चात कपात करून नुकसान कमी करण्यासाठी आता शनिवारी पत्रांची डिलिव्हरी केली जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अर्थात पत्रे वाटली जाणार नसली तरी पार्सल सेवा मात्र सुरू राहणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

आठवड्यातले सहा दिवस पार्सल वाटप आणि पाच दिवस पत्र वाटप करण्याचा निर्णय यूएस पोस्ट सव्र्हिसने घेतला असला अणि ही सेवा देशात स्वतंत्र संस्था म्हणून कार्य करत असली तरीही त्यांच्यावर काँग्रेशनलचे नियंत्रण आहे. पत्र वाटपाचा एक दिवस कमी केला तर पोस्टाची वर्षाला २ अब्ज डॉलर्सची बचत होऊ शकणार आहे असे या सेवेतील अधिकार्यांाचे म्हणणे आहे.

गेली कांही वर्षे इंटरनेट आणि ईमेल वापरामुळे पोस्टामार्फत पत्रे पाठविण्याचे प्रमाण अमेरिकेतही रोडावले आहे. पोस्ट सेवेच्या अहवालानुसार यामुळे संस्थेला १५.९ अब्ज डॉलर्स वार्षिक नुकसानीस सामोरे जावे लागते आहे. मात्र पार्सल सेवेत १४ टक्के वाढ झाली आहे. तरीही कर्जबाजारी होण्याची वेळ टाळण्यासाठी निवृत्तांना आरोग्य सेवेचे फायदे दिले गेलेले नाहीत. २००६ पासून पोस्टाने काटकसरीचा उपाय म्हणून कर्मचारी संख्याही २८ टक्के कमी केली आहे. आठवड्यातून पाच दिवस पत्रवाटप हाही या काटकसरीचाच भाग आहे असे सांगण्यात येत आहे.

Leave a Comment