साईबाबांसाठी आता सोन्याची चिलीम

शिर्डी दि.६ – मुंबईतील एका भाविकाने शिर्डीतील साईबाबांसाठी सोन्याची चिलीम दान केली ४७५ ग्रॅम वजनाच्या या चिलीमीची किंमत साडेबारा लाख रूपये असल्याचे समजते. या भाविकाने आपले नांव जाहीर करण्यास मनाई केली आहे मात्र गेली ३५ वर्षे तो नित्यनेमाने साईबाबांच्या दर्शनासाठी येत असल्याचे त्याने सांगितले.

या भाविकाने दिलेल्या माहितीनुसार दर गुरूवारी साईबाबांची पालखी निघते. त्यावेळी चांदीच्या चिलिमीत तंबाखू भरून ती पेटविली जाते. तेव्हाच बाबांना सोन्याची चिलीम द्यावी असे त्यांच्या मनात आले व त्यानुसार त्यांनी हे दान केले आहे. आता यापुढे पालखीच्या वेळी ही सोन्याची चिलीम पेटविली जाणार आहे.

नवीन वर्षाची सुरवात झाल्यापासून म्हणजे १ जानेवारीपासून आत्तापर्यंत शिर्डी संस्थानाकडे भाविकांनी दिलेले चार किलो सोने जमा झाले आहे. त्यात अर्धा किलो सोन्याचा आरतीचा दिवा, १ किलो वजनाचा सोन्याचा लोटा यांचा समावेश असून या एकूण सोन्याची बाजारातील किंमत १ कोटी २० लाख रूपये इतकी असल्याचेही संस्थानच्या सेवेतील अधिकार्यांाचे म्हणणे आहे.