मोदींवर आगामी निवडणुकांत मोठी जबाबदारी – राजनाथसिह

नवी दिल्ली दि.२५ – भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विराजमान झालेले राजनाथसिंग यांनी पहिल्याच मुलाखतीत गुजराथचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर आगानी २०१४ सालच्या लोकसभा निवडणुकीत मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते असे सूचित केले आणि कदाचित तेच भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात असेही संकेत दिले आहेत.

राजनाथसिंग यांनी दिलेल्या मुलाखतीत नवी दिल्लीतील केंद्रीय नेत्यांशी ते मोदी यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा करणार असल्याचे तसेच मोदी यांच्याशीही चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्या चर्चेचा तपशील आत्ताच सांगितला जाणार नाही असेही त्यांचे म्हणणे आहे. पक्षातील आपली भूमिका केवळ संघटनात्मक जबाबदार्यांअपुरतीच मर्यादित असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भाजपचे नेतेपद कुणाकडे असावे हे ठरविण्याचा अधिकार भाजप पार्लमेंटरी बोर्डकडे असतो असे सांगून ते म्हणाले की ही टॉप डिसिजन मेकींग बॉडी आहे.

भाजपला नेता स्वच्छ प्रतिमेचा, लोकप्रिय आणि सहज स्वीकारला जाणारा हवा असे सांगून ते म्हणाले की मोदींनी गुजराथ आदर्श राज्य बनविले आहे. तेथील प्रशासन उत्कृष्ठ दर्जाचे आहे आणि मोदी देशात लोकप्रिय आहेत.

अेबीपी न्यूज आणि नेल्सनने गडकरींनी राजीनामा देण्याअगोदर आणि राहुल गांधी यांच्या उपाध्यक्षपदी निवडीची घोषणा होण्याअगोदर २८ शहरात केलेल्या सर्वेक्षणातही पंतप्रधानपदासाठीच्या उमेदवारांत मोदींनी सर्वाधिक ४८ टक्के मते मिळविल्याचे दिसून आले आहे. कालच या सर्वेक्षणाचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. मनमोहनसिग यांना ७ टक्के तर राहुल गांधी यांना १६ टक्के मते मिळाली आहेत.