कॉफीच्या पानांपासून चहा

चहाची तल्लफ जशी आवरता येत नाही तशीच कॉफी पिणार्यां्नाही कॉफीशिवाय अजिबात चैन पडत नाही. चहाने अधिक तरतरी येते की कॉफीपासून हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. मात्र या दोन्ही पेयांचे दुष्परिणामही वारंवार सांगितले जात असतात. संशोधकांनी मात्र या दोन्ही पेयांपेक्षा अधिक आरोग्यदायी असा चहा तयार केला आहे आणि तोही कॉफीच्या झाडाच्या पानापासून. चवीला अतिशय मस्त, चहापेक्षा कमी कडू आणि कॉफीइतका स्ट्राँग नसलेले हे पेय मधुमेहींना उपयुक्त आहे तसेच निरोगी माणसांत हृदयविकाराचा धोका कमी करण्यासही उपयुक्त आहे असा संशोधकांचा दावा आहे.

 ब्रू असे नामकरण करण्यात आलेल्या या चहात कॅफिनची मात्रा कमी आहे आणि अँटी ऑक्सिडंटस जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे मधुमेह, कर्करोग, हृदयविकारचा धोका कमी होतोच पण ही द्रवे सूज कमी करण्यासही मदत करतात. दक्षिण लंडनच्या रॉयल बोटॅनिकल गार्डनमधील संशोधकांनी फ्रान्सच्या संशोधकांसमवेत हे संशोधन केले आहे. बॉटनी तज्ञ डॉ.अरोन डेव्हीस यांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने हे संशेाधन केले. त्यांच्या मते आजपर्यंत कॉफीच्या बियांकडेच सारे लक्ष केंद्रीत केले गेले होते. त्यामुळे कॉफीच्या पानांकडे दुर्लक्षच झाले होते. यासाठी कॉफी झाडाच्या  विविध प्रकारच्या २३ प्रजातींचे त्यांनी संशोधन केले व त्यातून हे निष्कर्ष निघाले.

या नव्या संशोधनामुळे आरोग्य प्रदान करण्याचे दावे करणार्याल ग्रीन टी, ब्लॅक टी, कॉफीचे नाना प्रकार यांना एकप्रकारे नवे आव्हानच निर्माण झाले असून हे संशोधन बॉटनी जर्नलमध्ये प्रसिद्धही करण्यात आले आहे.

Leave a Comment