
नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याचे षडयंत्र रचले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) धमकीचा ई-मेल मिळाला असून ज्यात नरेंद्र मोदींना जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ई-मेलचा तपास सुरु आहे.
पंतप्रधानांना जीवे मारण्याच्या धमकीचा एनआयएला ई-मेल
केवळ तीन शब्दच या ई-मेलमध्ये लिहिण्यात आले असून या ई-मेलमध्ये Kill Narendra Modi असा उल्लेख करण्यात आला आहे. एनआयएने याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सतर्क केले आहे. याबाबत गृहमंत्रालयाने एसपीजीलाही माहिती दिली असून पंतप्रधानांच्या सुरक्षेची एसपीजीवर जबाबदारी आहे.
याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाला लिहिलेल्या आपल्या पत्रात राष्ट्रीय तपास यंत्रणेने लिहिले आहे की, एक ई-मेल आयडी एनआयएला सापडला आहेत, ज्यात देशातील काही मान्यवरांच्या हत्येचा उल्लेख करण्यात आला. ई-मेलमधील मजकुरातून असेच संकेत मिळत आहेत. आपल्या पत्रासोबत ई-मेलची कॉपीही एनआयएने जोडली आहे. तसेच गृहमंत्रालयाने यावर योग्य कारवाई करण्यास सांगितले आहे.
वृत्तानुसार [email protected] नावाच्या अकाऊंटवरुन [email protected] वर हा ई-मेल पाठवण्यात आला असून हा ई-मेल मध्यरात्री 1 वाजून 34 मिनिटांनी पाठवण्यातला आहे. नरेंद्र मोदी यांना मारण्याचा उल्लेख मेलमध्ये करण्यात आला आहे. हा ई-मेल समोर आल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. रॉ, गुप्तचर यंत्रणा, संरक्षण गुप्तचर यंत्रणा एनआयएच्या संपर्कात असून या ई-मेलमधील मजकुराचा सध्या तपास सुरु आहे.
