मुंबईची पाकव्याप्त काश्मीरशी तुलना करणे कंगनाला पडले महागात


देशभरातील अनेकांच्या घरातील चुली ज्या मुंबईमुळे पेटतात, त्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे अभिनेत्री कंगना राणावतविरोधात सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष व्यक्त केला जात आहे. दरम्यान कंगनाने ट्विटरच्या माध्यमातून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागल्याची टीका केली होती.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सातत्याने बॉलीवूडसह अनेक राजकीय नेत्यांविरोधात भाष्य करणाऱ्या कंगनाने मुंबई पोलिसांची सुरक्षा घ्यायला, चित्रपट माफियांपेक्षा आपल्याला मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्याचे म्हणत नकार दिला होता. महाराष्ट्र पोलिसांबद्दल कंगनाने केलेल्या टीकेवरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी कंगनाला सुनावले होते. तसेच तिला मुंबईत भीती वाटत असेल तर तिने परत मुंबईत येऊ नये, असे त्यांनी म्हटल्यानंतर आता कंगनाने संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले होते.

मला शिवसेना नेते संजय राऊत यांनी धमकी दिली असून पुन्हा मुंबईत परतू नये असे म्हटले. मुंबईच्या रस्त्यांवर यापूर्वी स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?, असे कंगना म्हणाली.

त्यानंतर भाजप आमदार राम कदम यांनी कंगनाचे समर्थन करत, कंगनाने मुंबईत का येऊ नये? महाराष्ट्र सरकारला कशाची भीती वाटते. जर ती स्वतः पुढे बॉलीवूड मधील ड्रग माफिया, राजकारणी, अभिनेता यांची नावे सांगण्याचे घाडस कंगना दाखवत आहे. याविषयी कंगनाचे कौतुक न करता कंगनाला धमकावण्याचे प्रयत्न केले जात आहे. वास्तवात महाराष्ट्र सरकार कंगनाला घाबरत आहे. कारण तिने नाव सांगितली तर सर्वांची नावे देशासमोर येतील. त्यामुळे तिला धमकावले जात आहे. पण राज्य सरकार हे विसरत आहे की संपूर्ण देश कंगनाच्या पाठीमागे उभा आहे. कंगना झाशीची राणी आहे, ती अशा धमक्यांना घाबरणार नसल्याचे म्हटले आहे.

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगना रणौत आणि तिला पाठिंबा देणाऱ्या भाजप आमदार राम कदम यांचा समाचार घेतला आहे. ज्या मुंबईने राहायला घर, खायला अन्न दिले त्याची तुलना पाकव्याप्त काश्मीरबरोबर करणाऱ्या वक्तव्याचा मी निषेध करतो. अशा स्त्रीचा निषेध करण्याऐवजी तिची तुलना भाजप आमदार झाशीच्या राणीशी करत असल्याचे म्हटले आहे.