आता ‘या’ राज्याने घातली रमी, पोकर सारख्या ऑनलाईन गेम्सवर बंदी

केंद्र सरकारने काल राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत पबजीसह 118 अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर आज आंध्र प्रदेश सरकारने रमी आणि पोकर सारख्या ऑनलाईन गेम्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारचे म्हणणे आहे की, या गेम्स युवकांना चुकीच्या मार्गावर नेत असून, ज्यामुळे यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

आंध्र प्रदेशचे सुचना मंत्री पर्नी वेंकटरमैया यांनी माहिती दिली की, मुख्यमंत्री वायएस जगनमोहन रेड्डी याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऑनलाईन जुगारावर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  ऑनलाइन जुगार तरुणांना दिशाभूल करून त्यांचे नुकसान करीत आहे. त्यामुळे आम्ही युवकांच्या सुरक्षेसाठी अशा गेम्सवर बंदी घातली.

राज्याच्या कॅबिनेट बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, ऑनलाईन जुगाराचे आयोजन करणाऱ्यांना पहिल्यांदा गुन्हा केल्यास दंडासोबत 1 वर्ष कारावासाची शिक्षा होईल. दुसऱ्यांदा गुन्हा केल्यास दंडासह 2 वर्ष कारावास होईल. याशिवाय ऑनलाईन गेम खेळताना आढळल्यास 6 महिन्याची शिक्षा होईल.