रोबो स्पेशल रेस्टॉरंट

बिजिंग दि.१५- रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर वेटरला टीप किती द्यावी याचे ग्राहकाला नेहमीच कोडे पडलेले असते. चीनमध्ये सुरू करण्यात आलेल्या स्कीफी रेस्टॉरंटमध्ये मात्र ग्राहकाला हा प्रश्न पडणार नाही कारण येथे सर्वच कामांसाठी रोबो नेमण्यात आले आहेत. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये प्रवेश केलात की तुमचे स्वागत करणारा रोबोच रिशेप्शनिस्ट म्हणून दिसेल. ‘ अर्थ पर्सन, हॅलो. रोबो रेस्टॉरंटमध्ये तुमचे स्वागत आहे ‘ असे हे स्वागत आहे. पदार्थांची ऑर्डर घेणाराही रोबोच असून पदार्थ तयार करणाराही रोबोच आहे. तुमची ऑर्डर तुमच्यापर्यंत आणणाराही रोबोच. इतकेच नव्हे तर तुम्ही पदार्थांचा आस्वाद घेत असताना गाणी म्हणून तुमचे मनोरंजन ही रोबोच करणार आहे. विशेष म्हणजे विविध कामासाठी वापरले जात असलेले हे रोबो चीनी कंपनीनेच तयार केलेले आहेत.

रेस्टॉरंटचे मालक लिऊ हशेंग यांनी या नेस्ट जेन रेस्टॉरंटसाठी ८० लाख डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. संगणक खोलीत बसलेला स्टाफ या रोबोंचे नियंत्रण करतो. हे रोबो इलेक्ट्रिसिटीवर चार्ज केले जातात आणि दोन तास चार्ज केल्यानंतर पाच तास ते व्यवस्थित काम करतात. ग्राहकाने पदार्थाची ऑर्डर दिली की ती पदार्थ तयार करणार्या् रोबोपर्यंत पोहोचविली जाते आणि तो लगेच कामाला लागतो. पदार्थ तयार झाला की कन्व्हेअर बेल्टच्या सहाय्याने ग्राहकापर्यंत येतो आणि तेथील रोबो तुमची डिश तुमच्या पुढ्यात ठेवतो असेही त्यांनी सांगितले.