बलात्कारित युवतीने स्वत:ला जाळून घेतले

पानिपत: बलात्काराला बळी पडलेल्या १६ वर्ष वयाच्या युवतीने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. तिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

हरियाणातील सोनपत जवळ खरखौदा या गावात राहणाऱ्या दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या या युवतीवर त्याच गावातील राकेश उर्फ काला याने दि. ५ जानेवारी रोजी बलात्कार केला. या प्रकाराबद्दल कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीही दिली.

या प्रकारानंतर भेदरलेल्या या युवतीने या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितले नाही. मात्र त्यानंतर आलेल्या मनोशारीरिक ताणामुळे ती अबोल आणि अस्वस्थ होती. अखेर हा ताण सहन न झाल्याने शुक्रवारी रात्री तिने या प्रकारची माहिती आपल्या कुटुंबियांना दिली. त्यानंतर लगेचच आपल्या अंगावर रॉकेल ओतून तिने जाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिच्या कुटुंबियांनी आग विझवून या युवतीला गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले.

तिच्यावर उपचार सुरू असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.