मुंबई: हातगाडी, पथारी वाल्यांच्या विरोधातील अतिक्रमण कारवाई दरम्यान पथारीवाल्याचा मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस दलातील बहुचर्चित अधिकारी वसंत ढोबळे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून पथारीवाल्याच्या मृत्यूचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला आहे.
मुंबईतील विलेपार्ले आणि सांताक्रूज उपनगरात रस्त्यावरील हातगाडी, पथारी यांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असताना महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाबरोबर पोलिसांचे एक पथक रवाना करण्यात आले. या कारवाईच्या वेळी सहाय्यक पोलीस आयुक्त ढोबळे घटनास्थळी उपस्थित नव्हते. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार प्रत्यक्ष पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. मृत पथारीवाल्याच्या स्टोलसमोर अतिक्रमणविरोधी पथक पोहोचताच तो कोसळला. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मात्र या मृत्यू प्रकरणाने महापालिका आणि पोलिसांना पथारीवाल्यांच्या मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच ढोबळे यांची बदली करून तपास सीआयडीकडे देण्यात आला.
समाजसेवा शाखेत कार्यरत असताना ढोबळे यांनी मुंबईतील बड्या धेंडांचा वावर असलेले पब्ज, बार्स आणि नाईट क्लब्जवर केलेल्या कारवाईमुळे ते वादग्रस्त ठरले होते.