मुंबई पोलिस शोधताहेत हरविलेली पर्स

मुंबई दि. ९ – साखळी खेचली, पाकिट मारले असल्या तक्रारी घेऊन पोलिसांकडे जाणार्‍या नागरिकांची संख्या कमी नाही. अर्थात असल्या तक्रारी नोंदवायलाही पोलिस किती खळखळ करतात हा अनुभवही नवीन नाही. मात्र गेले दहा दिवस ठाणे आणि बोरिवली ठाण्याचे पोलिस रात्रंदिवस हरविलेल्या पर्सचा कसून शोध घेत असून या दहा रात्री पोलिसांना झोपेविना काढाव्या लागल्या असल्याचेही समजते.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार गृहमंत्री आर.आर. पाटील यांचे वैयक्तीक सहाय्यक विजयकुमार लोंढे यांची मेहुणी प्रतिभा कुमार घोष यांची पर्स दहा दिवसांपूर्वी ठाणे ते बोरिवली या दरम्यान हरविली. त्यांनी रितसर पोलिस तक्रार केली. मात्र पोलिसांनी कांही दाद दिली नाही. जेव्हा आर.आर. आबांचे सहाय्यक विजयकुमार लोंढे यांचा फोन पोलिसांना गेला आणि संबंधित पर्स त्यांच्या नातेवाईकांचीच असल्याचे कळले तेव्हा मात्र पोलिसांनी तातडीने हालचाल सुरू केली. अर्थात पर्स अद्याप सापडलेली नाही.

श्रीमती घोष या ओमान येथे राहतात. त्यांच्या मुलाच्या उपचारांसाठी त्या मुंबईत आल्या आहेत.याच कामासाठी त्या ठाण्याला डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी गेल्या होत्या. त्यानंतर त्यानी एटीएममधून १५०० रूपये काढले आणि रिक्षा करून त्या बस स्टॉपवर आल्या व बोरीवलीच्या बसमध्ये बसल्या. त्याचवेळी आपली पर्स हरविल्याचे त्यांच्या लक्षातआले. पर्समध्ये १४००० ओमान रियाल, क्रेडीट कार्ड, चालक परवाना व अन्य महत्त्वाची कागदपत्रेही होती असे समजते. पोलिसांनी हॉस्पिटलमधील सीसीटीव्हीचे फूटेज तपासले, रिक्षा चालकांची कसून चौकशी केली मात्र पर्सचा तपास लागला नाही असे सांगण्यात येत आहे. पर्स हरविल्याने घोष यांना ओमान येथे परतण्यात अडचणी निर्माण झाल्या असल्याचे लोंढे यांनी सांगितले.