जर्मन बेकरी पूर्वीच्याच दिमाखात पुन्हा सुरू

पुणे दि.१० – तीन वर्षानंतर कोरेगांव पार्क परिसरातील जर्मन बेकरी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. अर्थात ही बेकरी सध्या थोडक्याच मेनूसह तीन दिवसांपूर्वी अनौपचारिक रित्या सुरू झाली असून पंधरवड्यात औपचारिक समारंभ करून तिचे उद्घाटन करण्यात येणार आहे.१३ फेब्रुवारी २०१० ला या बेकरीत भीषण स्फोट होऊन अनेकांना जीव गमवावा लागला होता तर बरेचजण जखमी झाले होते.

तरूणाईचे आवडते ठिकाण असलेली ही बेकरी ग्राहकांसाठी तीन दिवसांपूर्वी सुरू केल्याचे मालक स्नेहल खरोसे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की सध्या थोडकाच मेनू उपलब्ध करून दिला असून त्यात प्रामुख्याने विविध प्रकारचे ब्रेड आणि पेस्ट्रीज ग्राहकांना पुरविल्या जात आहेत. बेकरीचे बाह्य स्वरूप आणि अंतर्गत स्वरूप बदलले गेले असले तरी पदार्थांची पूर्वीचीच चव कायम ठेवण्यात येत असल्याचेही त्या म्हणाल्या. जेथे स्फोट झाला, ती जागा रिकामी ठेवण्यात आली आहे आणि तेथे ग्राहकांसाठी टेबले मांडली जाणार नाहीत असेही त्यांनी सांगितले.

पंधरा दिवसांत बेकरीत ग्राहकांचे आवडते सर्व पदार्थ म्हणजे ब्रेड, डॅनिश पेस्ट्रीज, चॉकलेट केक, अॅव्हॅकॅडो रोल, फेटा चीज सँडवीच, स्पेशल मसाला चहा आणि ऑम्लेट उपलब्ध करून दिले जात आहेत.बेकरी सुरू होतात ग्राहकांची वर्दळही वाढू लागली आहे. पूर्वीपैकी तीनच कामगार कामावर असून बाकी सर्व नवीन कामगार आहेत. बेकरी पुन्हा बांधण्यासाठी ४५ लाख रूपये खर्च केले गेले आहेत. सरकारकडून १५ लाख रूपयांची नुकसान भरपाई दिली गेली होती असेही खरोसे यांनी सांगितले.