खतरनाक नक्षलवादी आशाण्णा गडचिरोलीच्या जंगलात

गडचिरोली: खतरनाक नक्षलवादी आशाण्णा हा गडचिरोलीच्या जंगलात लपलेला असल्याची माहिती मिळाल्याने गडचिरोलीत पोलिसांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. आशाण्णा हा नक्षलवादी संघटनेच्या केंद्रीय सैन्य समितीचा सदस्य आहे.

आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्यावर तिरुपती येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात आशाण्णा प्रमुख आरोपी आहे. त्याला पकडून देणाऱ्याला आंध्र सरकारने एक लाखाचे ईनाम जाहीर केले आहे. दोन आयपीएस अधिकारी आणि एका आमदाराच्या हत्येचा गुन्हाही त्याच्यावर दाखल आहे.
थवकलपल्ली वासुदेव राव हे त्याचे मूळ नाव असून तो आशाण्णा आणि सुजित या नावांनीही ओळखला जातो. तो मूळचा वरंगळचा रहिवासी आहे.

त्याचा गडचिरोलीत वावर असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांनी नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Leave a Comment