शिर्डीच्या साईबाबा ट्रस्टकडे पन्नास कोटी रूपयांचे दागिने

शिर्डी दि.८- जन्मभर फकीर म्हणून जगलेल्या आणि संतपद मिळविलेल्या शिर्डीच्या साईबाबा संस्थानाकडे  ५० कोटी ५३ लाख १७४७३ रू. किमतींचे सोने दागिने आणि रत्ने असून या ट्रस्टच्या ठेवीं तब्बल ६२७ कोटी ५७ लाख रूपयांच्या असल्याचे ट्रस्टने जाहीर केलेल्या वार्षिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात असलेले शिर्डी हे संस्थान देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक मानले जाते.

साईबाबांच्या दर्शनासाठी भारतभरातून सतत भाविकांची रीघ लागलेली असते. संस्थानाकडे देणग्या प्रचंड प्रमाणात जमा होतात तसेच रोजच्या दान पेटीतूनही पुष्कळ पैसा जमा होतो. भाविक साईबाबांच्या चरणी सोने, हिरे माणकांचे दागिनेही अर्पण करत असतात. २००४ साली महाराष्ट्र शासनाने देवस्थानाचे काम सुरळीत चालावे यासाठी ट्रस्ट स्थापन केला आहे. त्याचा अहवाल दरवर्षी सादर केला जातो. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातही हा अहवाल मांडला गेला होता.

यंदाच्या वर्षात दागिने आणि मौल्यवान रत्नांच्या रूपातून देवस्थानच्या तिजोरीत ११ कोटींची भर पडली आहे तर राष्ट्रयीकृत बँका, किसान विकास पत्रे यातील ठेवींतही लक्षणीय वाढ झाली आहे. अर्थात यंदाच्या वर्षात सोन्याची नाणी अथवा पदके कमी प्रमाणात आली असली तरी ही वाढ २८ लाखांहून अधिक आहे. संस्थानाकडे परदेशी चलन साठा १७ लाखांहून अधिक किंमतीचा असून विविध चॅरिटी कामांसाठी संस्थानाकडून ७६ कोटी ७५ लाखांच्या देणग्या दिल्या गेल्या आहेत. त्यात शिर्डी येथील नियोजित विमानतळासाठी दिलेल्या ४५ कोटींचाही समावेश आहे.

लंडन येथे भरविण्यात येणार्याा साईभजन संध्येसाठी साडेचोवीस लाखांहून अधिक खर्च केला गेला आहे तर विविध देणग्यांच्या स्वरूपात २०६ कोटी रूपये दिले गेले आहेत असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.