पुणे दि.१ – लक्झरी ऑन व्हील्स ही संकल्पना भारतीय जनमानसात रूजविणार्या् मर्सिडीज बेंझ या जर्मन कार उत्पादक कंपनीने नव्या वर्षात चार नवी मॉडेल्स भारतीय बाजारात आणण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे लक्झरी कारप्रेमी ग्राहकांना पुन्हा एकदा निवडीसाठी मोठा चॉईस मिळणार आहे.
भारतीय बाजारात लक्झरी कार क्षेत्रात जर्मन कंपन्यांनी निर्विवाद वर्चस्व गाजविले आहे. बीएमडल्ब्यू, ऑडी आणि मर्सिडीज या त्या कंपन्या आहेत. मात्र आता या क्षेत्रात आपला हिस्सा वाढविण्यासाठी या तीन कंपन्यातच स्पर्धा सुरू असून मर्सिडीजने आपल्या दोन प्रतिस्पर्धी कंपन्याचे आव्हान स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सहा महिन्यात मर्सिडीज त्यांची चार नवी मॉडेल्स बाजारात आणत आहे.
मर्सिडीज बेंझ जी ६३ एएमजी ही गलाँडवॅगन क्षेणीतील एसयूव्ही ही दणकट गाडी २०१३ च्या पहिल्या तिमाहीत बाजारात दाखल होत आहे. पूर्वीच्या मॉडेलपेक्षा ही नवी गाडी १३ टक्के अधिक इंधन बचत करणारी आहे. ई क्लास फेस लिफ्ट ही दुसरी कार दोन वर्षांपूर्वी बाजारात आणलेल्या ई क्लास सेडनची नवी आवृत्ती असून ही गाडी जूनमध्ये बाजारात येत आहे. बी कलास स्पोर्ट टूरर डिझेल जूनमध्येच बाजारात आणली जाणार आहे तर मर्सिडीज बेंझ ए क्लास हचबॅक जुलै २०१३ मध्ये बाजारात येईल असे कंपनीच्या अधिकार्यांतनी सांगितले.
या सर्व गाड्यांच्या किमती अजून गुलदस्त्यात असल्या तरी डिझेल टूरर व ए क्लास हचबॅक यांच्या किंमती अनुक्रमे ३० लाख व २० लाख असतील असे समजते.