अल कैदाने उत्तर मालीत बसविले बस्तान

दुर्गम आणि वाळवंटी उत्तर मालीत अभेद्य आणि अजिक्य किल्ले उभारून दहशतवादी संघटना अल कैदाने जणू तेथे आपले नवे राष्ट्रच मिर्माण केले असल्याचे समजते. उत्तर मालीत या संघटनेने आपली संरक्षण सिद्धता केली आहे आणि आता येथेच आपले स्वतःचे राष्ट्र निर्माण करण्याचा या इस्लामिक लढवय्यांचा प्रयत्न आहे.

येथील मजूरांनी अल कैदाच्या दहशतीमुळे पळून जाताना सोडलेले रोड रोलर, कॅटरपिलर, अर्थ मूव्हर्स यांचाच वापर करून अल कैदाने आपले बळकट किल्ले येथे उभारले आहेत. बोगद्यांचे अंतर्गत प्रंचड मोठे जाळेच त्यांनी तयार केले असून १ ट्रक एकावेळी जाऊ शकेल इतके हे बोगदे मोठे आहेत. येथे आक्रमण झालेच तर इंधनाची चणचण भासू नये म्हणून १०० ड्रम गॅसोलिनचा साठाही करण्यात आला आहे असे यूएन डिप्लेामॅट व १२० दिवस या अतिरेक्यांच्या ताब्यात काढलेले अपहृत कॅनेडियन रॉबर्ट फौलर यांनी सांगितले.

फौलर यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर मालीतील प्रचंड मोठा म्हणजे जवळजवळ ६२०,००० चौरस किलोमीटरचा प्रदेश अल कैदाने ताब्यात घेतला आहे. हा प्रदेश टेक्सास, फ्रान्सपेक्षाही मोठा असून तो जवळजवळ अफगाणिस्तानच्या आकाराएवढा आहे. या भागातील तिंबकट्टूचा ताबा घेताना अल कैदाच्या अतिरेक्यांनी १६ पैकी सात वर्ल्ड हेरिटेज म्हणून नोंदल्या गेलेल्या वास्तूही नष्ट केल्या आहेत असेही ते म्हणाले.