पवारांच्या विधानावरून काँग्रेसचा प्रतिटोला

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर निवडणुका लढवून विरोधात बसायचे आहे का; असा सवाल करून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना टोला लगावला.

केरळ राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित बैठकीत बोलताना पवार यांनी राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल असा इशारा दिला होता. काँग्रेसने गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी उमेदवारांसमोर उमेदवार उभे केल्याबद्दल पवार यांनी काँग्रेसवर आगपाखड केली.
पवार यांना प्रत्युत्तर देताना; मागील लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांचा निकाल पहिला तर लक्षात येईल की काँग्रेस कुठे अन राष्ट्रवादी कुठे; अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवारांची खिल्ली उडवली.

मुख्यमंत्र्यांच्या पाठोपाठ महाराष्ट्राचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनीही पवार आणि राष्ट्रवादीवर बोचरी टीका केली. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसने जे केले; तेच काँग्रेसने गुजरातमध्ये केले असल्याचे नमूद करून ठाकरे यांनी पवारांच्या आघाडीतून बाहेर पडून स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या विधानाचा समाचार घेतला.

काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सन्मानाची वागणूक न दिल्यास सन २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल; असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिला. काँग्रेसबरोबर काम करण्याचा आमचा अनुभव फारसा चांगला नसल्याची टीकाही त्यांनी केली.

केरळ राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या बैठकीत बोलताना काँग्रेस पक्षाला कडक इशारा दिला. विशेषत: गुजरात निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केल्याबद्दल पवारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

गुजरात निवडणुकीत ९ ठिकाणी काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराविरुद्ध आपल्या उमेदवाराला उभे केले. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीत विजय मिळविण्यास मदतंच झाली. एकत्र काम करण्याची ही पद्धत नव्हे; अशा शब्दात पवारांनी काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने हीच पद्धत कायम ठेवल्यास सन २०१४च्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यावा लागेल; असा इशाराही त्यांनी दिला.

केंद्र सरकारमध्ये काही धोरणे राबविताना राष्ट्रवादीच्या सूचनांकडे काँग्रेसने सपशेल दुर्लक्ष केले असून काँग्रेसबरोबर काम करण्याचा आमचा अनुभव फारसा चांगला नाही; असेही पवार यांनी स्पष्ट केले.