कल्याण: एकिकडे दिल्लीतील सामुहिक बलात्कार प्रकरणाने महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे; तर दुसरीकडे महिलांवर अत्याचाराची मालिका अखंड सुरूच आहे. मात्र या घटनांहून माणुसकीला लाजविणारी घटना रोहिदासवाडा परिसरात घडली. या परिसरातील एका मतिमंद मुलावर चौघांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याच्या सर्वांगाला सिगरेटचे चटके दिले. बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून दोन जण फरारी आहेत.
डॉ.अन्सारी चौकात पाणीपुरी खाण्यासाठी गेलेल्या १४ वर्षीय मतिमंद मुलाला शम्मू मांडेकर, तौफिक रईस, अश्रफ आणि एक जणाने गोड बोलून मांडेकर याच्या दुकानाच्या गच्चीवर नेले. त्याला विवस्त्र करून त्यांनी त्याच्याशी जबरी संभोग केला. त्यानंतर सिगरेटने त्याच्या सर्वांगाला चटके दिले. त्याच्या डोक्यावरचे केस कापले आणि भुवईचे केस जाळून टाकले. हा प्रकार कुणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी देऊन त्याला सोडून दिले.
या मुलाने घरी जाऊन झाल्या प्रकाराबद्दल आपल्या वडिलांना सांगितले. त्यांनी या चौघांना त्याबद्दल जाब विचारला असता त्यांनाही आरोपींनी पोलिसात गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी तातडीने गुन्हे नोंदवून मांडेकर आणि रईस यांना जेरबंद केले. इतर दोघे फरारी आहेत.
माणुसकीला काळीमा फासणार्या या घटनेने कल्याण शहरात संतापाची लाट उसळली आहे.