मालेगाव बॉम्बस्फोट: संशयित जेरबंद

मुंबई: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने इंदूर येथून एका आरोपीला जेरबंद केले. मालेगाव स्फोट प्रकरणी अटक करण्यात आलेला हा पहिला आरोपी आहे. त्याच्यावर स्फोटके ठेऊन गुन्हेगारी कट रचण्याचा आरोप आहे.

मोहन असे या आरोपीचे नाव असून इंदूरजवळच्या हतोड परिसरात अटक करण्यात आली. मोहनला अटक करून इंदूरच्या न्यायालयात त्याची प्रवासी कोठडी घेण्यात आली. त्याला मुंबई येथे न्यायालयासमोर हजर करून राष्ट्रीय तपास यंत्रणा तपासासाठी त्याला कोठडीत घेतील.

समझोता एक्स्प्रेसमध्ये स्फोटके ठेवण्याचा संशय असलेला राजेश चौधरी याच्याकडे केलेल्या चौकशीतून मोहन याच्याबद्दल राष्ट्रीय तपास यंत्रणेला माहिती मिळाली. धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असलेल्या मालेगाव येथे प्रार्थनास्थळाजवळ बॉम्बस्फोट होऊन त्यात ३५ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटानंतर दहशतवाद प्रतिबंधक विभागाने ७ मुस्लिम युवकांना अटक केली होती. मात्र स्वामी असीमानंद यांना सन २०११ मध्ये अटक झाल्यानंतर या घटनेमागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा संशय बळावला.

Leave a Comment