मुंबईत मूकबधीर मुलीवर सामुहिक बलात्कार

मुंबई: दिल्लीतील माणुसकीला काळीमा फासणारी सामुहिक बलात्काराची घटना घडल्यानंतर देशभर तीव्र प्रतिसाद उमटत असले तरीही गुन्हेगारांना ना कायद्याची जरब आहे ना पोलिसांची! देशाच्या राजधानीत बुधवारी आणखी एका महिलेवर सामुहिक बलात्काराची घडल्याचे उघड झाले; त्यापाठोपाठ राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत तर विकृत मानसिकतेच्या लिंगपिसाट जमावाने अल्पवयीन मूकबधीर मुलीच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली.

ही घटना मुंबईच्या चेंबूर परिसरात बुधवारी दुपारी घडली. या असहाय्य मुलीला दोघांनी जवळच्याच एका स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर अमानुष बलात्कार केला. ही मुलगी मूकबधीर असल्याने तिच्याकडून कोणतीच माहिती मिळू शकत नसल्याने पोलिसांच्या तपासात मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. मात्र हा निर्घृण प्रकार करणारे नराधम ही मुलगी राहत असलेल्या परिसरातीलचा असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

चेंबूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात सामुहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.