राष्ट्रीय विकास परिषदेत ‘मानापमान’ नाट्य

नवी दिल्ली: राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीत आपल्याला बोलण्यास पुरेसा वेळ देण्यात आला नाही; याबद्दल निषेध व्यक्त करून तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी सभात्याग केला. मात्र सर्व मुख्यमंत्र्यांना बोलण्यासाठी केवळ १० मिनिटांचा वेळ निर्धारित केला असल्याने जयललिता यांनी त्या मर्यादेत आपले म्हणणे मांडणे आवश्यक होते; अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे.

केंद्र आणि राज्यांमध्ये समन्वय साधून विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय विकास परिषदेच्या बैठकीला सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला पंतप्रधान मनमोह सिंग यांनी महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी सरकारचीच असल्याचा निर्वाळा दिला. महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यात आवश्यक त्या सुधारणा करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. याबाबत सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी एकसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आल्याची घोषणाही त्यांनी केली.

मंदीमुळे देशाचा विकासदर घातला असून गरीबीचे प्रमाणही वाढत असल्याबद्दल पंतप्रधानांनी चिंता व्यक्त केली. मात्र १२ व्या पंचवार्षिक योजनेत ८ टक्के विकासदराचे उद्दिष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.

या बैठकीत जयललिता यांचे भक्षण सुरू होऊन १० मिनिटे पूर्ण होताच घंटा वाजवून त्यांना भाषण आटोपते घेण्याचा इशारा देण्यात आला. मात्र जयललिता यामुळे संतप्त झाल्या आणि त्या बैठकीतून बाहेर पडल्या. त्या वेळी जयललिता यांच्या भाषणाचा केवळ एक तृतियांश भाग पूर्ण झाला होता. या बैठकीत मुख्यमंत्र्यांना बोलण्यास अधिक वाव मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती.

Leave a Comment