सीटी स्कॅनपेक्षा सोनोग्राफी सुरक्षित

वॉशिंग्टन दि.२६- अपेंडिक्स सारख्या अवयवाच्या दुखण्याचे निदान करण्यासाठी व शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे वा नाही हे ठरविण्यासाठी एकस रे किवा सीटीस्कॅनपेक्षा साऊंड वेव्हच्या सहाय्याने केली जाणारी सोनोग्राफी (अल्ट्रा साऊंड) अधिक सुरक्षित असल्याचे मत वैद्यकीय संशोधकांनी केले आहे. एक्स रे अथवा सीटीस्कॅनमध्ये रेडिएशनचा वापर होत असल्याने ते लहान मुलांमधील निदाने या तंत्राने करताना भविष्यकाळात अन्य रोगांसाठी कारणीभूत ठरू शकतात असे या तज्ञांचे म्हणणे आहे.

अपेंडिक्स हा मानवी शरीरात मोठ्या आतड्याच्या टोकाशी असलेला एक छोटासा भाग असतो. बरेचवेळा या अपेंडिक्सला सूज येते अथवा संसर्ग होतो आणि हे अपेंडिक्स फुटायच्या आधीच ते शस्त्रक्रिया करून काढून टाकावे लागते अन्यथा माणसाच्या जीवावर बेतते. पण अपेंडिक्सचे निदान करणे अवघड असते कारण व्हायरल इन्फेक्शनप्रमाणेच याची लक्षणे असतात. म्हणजे पोटात दुखणे, उलट्या, ताप येणे वगैरे.त्यामुळे अपेंडिक्सचे दुखणे आहे काय हे वेगाने व अचूक कळावे यासाठी सीटीस्कॅन करण्याचा मार्ग डॉक्टर अवलंबितात. मात्र लहान मुलांचे सीटीस्कॅन केले गेले तर त्यातील रेडिएशनमुळे या मुलांना भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे सीटीस्कॅन ऐवजी सोनोग्राफीचा उपयोग सुरक्षित ठरतो असे वॉशिंग्टन येथील युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीन, सेंट लुईस येथील तज्ञांचे म्हणणे आहे.