वाजपेयी आणि मोदी

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा ८८ वा वाढदिवस. भारतातला सर्वाधिक त्यागी आणि सहा वर्षे पंतप्रधानपद उपभोगलेले नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. अटलजी या नावाने परिचित असलेले हे आपले माजी पंतप्रधान नव्वदीच्या उंबरठ्यावर उभे आहेत. पण ते आता राजकारणात काही करू शकत नाहीत.  भारतीय जनता पार्टीला तर त्यांच्या तोडीच्या नेत्याची गरज आहेच पण देशालाच तेवढा सन्माननीय नेता कोणी उरलेला नाही. अटलजींना तोड नाही असे आपले मत आहे

पण भाजपाच्या उत्तर प्रदेशातल्या कार्यकर्त्यांना नरेन्द्र मोदी यांच्यात दुसरे अटलजी दिसत आहेत. अटलजी नव्याने राजकारणात आले तेव्हा म्हणजे १९५० – ६० च्या दशकात ते नेहरूंच्या पक्षात नसले तरीही त्यांना भारताचा दुसरा नेहरू असे म्हटले जात होते. वयाची तिशीही न गाठलेले वाजपेयी संसदेत परराष्ट्र खात्याच्या मागण्यांवर भाषण करायला उभे रहात तेव्हा  नेहरू सभागृहात नसले तरी पळत पळत लगबगीने सदनात येत असत आणि या तरुण नेत्याचे भाषण केवळ लक्ष देऊन ऐकतच असत असे नाही तर हातात वही घेऊन त्या भाषणातले काही मुद्दे टिपून घेत असत. म्हणूनच वाजपेयींना दुसरे नेहरू म्हटले जात होते.

अटलजी हे दुसरे नेहरू होते पण आता दुसरे अटलजी कोण असा प्रश्न आहे. भारतीय जनता पार्टीला सरकार स्थापन करण्याची संधी मिळाली तर पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून ज्याच्या नावावर एकमत होईल असा नेता कोण असा प्रश्न पडला आहे. १९९८ साली अशी संधी मिळाली तेव्हा अटलजींचे नाव पुढे आले आणि त्या नावावर भाजपातच काय पण भाजपाच्या मित्र पक्षातही एकमत झाले. भाजपाचा पंतप्रधानपदाचा उमेदवार संघाचे नेते ठरवतात. संघाचा पाठींबा नसेल तर कितीही चांगला माणूस या पदावर बसू शकत नाही. एवढा भाजपावर संघाचा पगडा आहे.

वाजपेयी पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्याबाबत भाजपात आणि आघाडीत एकमत होते पण संघाचा कल वाजपेयी यांच्या पेक्षा अडवाणी यांच्याकडे अधिक होता कारण त्या काळात अडवाणी यांनी कट्टर हिंदुत्ववादी अशी आपली प्रतिमा निर्माण केली होती आणि  वाजपेयी हे उदारमतवादी नेते म्हणून ओळखले जात होते. म्हणजे संघाची थोडी नाराजी असतानाही वाजपेयीच सरस ठरले. वाजपेयी यांच्या लोकप्रियतेपुढे संघाला माघार घ्यावी लागली.

आता दुसरा वाजपेयी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोदी हेच दुसरे वाजपेयी असा आपल्या मनाचा कौल दिला आहे. कारण आज वाजपेयींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उत्तर प्रदेशात लागलेल्या डिजिटल बोर्डांवर वाजपेयी आणि मोदी यांची छायाचित्रे लागली आहेत. भाजपाचे कार्यकर्ते वाजपेयींच्या  बरोबरच मोदी यांना राष्ट्रीय नेता मानतात असे यातून ध्वनित झाले आहे. खरोखर मोदी वाजपेयींची जागा घेतील का ? नरेंद्र मोदी यांचे समर्थक तसा प्रचार करीत आहेत.  खरे तर देशाच्या सर्वोच्च पदापर्यंतची त्यांची ही वाटचाल म्हणावी तेवढी सोपी नाही. त्यांना अनेकविध पातळ्यांवर संघर्ष करावा लागणार आहे.

नरेंद्र मोदी यांची गुजरातमधली विलक्षण लोकप्रियता, बड्या भांडवलदारांचा त्यांना मिळणारा पाठींबा, देशाचा दक्षिण भाग वगळता अन्य राज्यांमध्ये हिंदू मतदारांची सहानुभूती मिळण्याची शक्यता, हुकुमशाही प्रवृत्ती आणि जात या गोष्टी मोदी यांना पंतप्रधान होण्यास अनुकूल ठरणार्यात आहेत. पण दुसर्या  बाजूला संघाची नाराजी, पक्षांतर्गत स्पर्धा, घटक पक्षांचा विरोध, मुस्लीम मतदारांत असलेली नाराजी या गोष्टी त्यांच्या विरोधात जाणार्याु आहेत. मोदी गुजरातमध्ये कितीही लोकप्रिय असले तरी गुजरातच्या बाहेर ते कितपत लोकप्रिय आहेत याबाबत अजून शंका आहेत.

त्यांनीही आपली ही गुजरातबाहेरची लोकप्रियता कधी पडताळून पाहिलेली नाही. अटलबिहारी वाजपेयी हे भारताच्या कानाकोपर्यानत विलक्षण लोकप्रिय होते. ज्या लोकांना भारतीय जनता पार्टी हा पक्ष सुद्धा माहीत नव्हता त्यांना वाजपेयी मात्र माहीत होते आणि त्यांच्याविषयी लोकांच्या मनात आदर होता. तशी लोकप्रियता असणारा भारतीय जनता पार्टीत अडवाणी यांच्याशिवाय दुसरा नेता नाही. देशाच्या कानाकोपर्या.तली जनता नरेंद्र मोदी आणि सुषमा स्वराज यांना जाणते. परंतु या दोघांच्याही लोकप्रियतेचा आलेख वाजपेयी आणि अडवाणी यांच्याएवढा मोठा नाही. आणि काही प्रमाणात असला तरीही तो भारतीय जनता पार्टीला मते मिळविण्यासाठी कितपत उपयुक्त ठरू  शकेल हे आता सांगता येत नाही.       

मुळात मोदींना पंतप्रधान व्हायचे असेल तर भारतीय जनता पार्टीला बहुमत मिळणे गरजेचे आहे. परंतु सध्या तरी केंद्रामध्ये भाजपाच काय पण काँग्रेसला सुद्धा स्वतःच्या बळावर सरकार स्थापन करण्याएवढे बहुमत मिळणे शक्य नाही. पण  ते मिळाले तरीही  मित्र पक्षांचा पाठींबा मोदींना मिळवावा लागणार आहे. याबाबतीत अडवाणी मोदी यांच्या पेक्षा पुढे आहेत हे त्यांना लक्षात ठेवावे लागेल.

Leave a Comment