पुणे दि.२५ – काँग्रेस पक्षाचा १२७ वा वर्धापन दिन २८ डिसेंबर रोजी राज्यभर साजरा केला जाणार असून पुणे शहर काँग्रेस त्यादृष्टीने कामाला लागली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या निमित्ताने मुंबईत आयोजित केलेल्या सार्वजनिक सभेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार आहेत तर पुण्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले आहे.
काँग्रेस लागली कामाला
याविषयी अधिक माहिती देताना शहर काँग्रेसचे प्रमुख अभय छाजेड म्हणाले की निवडणुकांच्या दृष्टीनेही आम्ही या वर्धापनदिनाचे निमित्त करून तयारी करत आहोत. राज्यातील व केंद्रातील वरीष्ठ नेत्यांनी त्यासंबंधात आम्हाला सूचना दिल्या असून पूर्ण पाठिंबाही दर्शविला आहे. राज्य शासनाने राज्यात राबविलेल्या अनेक विकास योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला कळावी यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. निवडणुकांचा प्रचारही कांही नगरसेवक आणि नेत्यांनी सुरू केला आहे. त्याचबरोबर सबसिडीसाठी प्रत्येकाला आता बँक खाते असणे बंधनकारक झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना बँक खाती उघडण्यास मदत करण्यावर आम्ही भर दिला आहे.
राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनीही पुणे भेटीत कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे, डामडौलात वेळ घालवू नये असे आदेश दिले असल्याचेही कार्यकर्त्यांनी सांगितले.
