सिडनी दि.२५- शीख धर्मियांत पवित्र मानले जाणारे आणि शीख पुरूषांना ज्या पाच वस्तू अंगावर बाळगणे धर्माने बंधनकारक समजले जाते त्यापैकी एक असलेले कृपाण शाळेच्या आवारात आणण्यावर ऑस्ट्रेलियात बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी आणता यावी यासाठी सरकारने वेपन अॅक्ट १९९० मध्ये सुधारणाही केली असल्याचे समजते. या बंदी विरोधात शीख समुदायाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून या बंदीचा सरकारने पुर्नविचार करावा अशी मागणी केली आहे.
ऑस्ट्रेलियात शाळेत कृपाण आणण्यास बंदी
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील शाळेत १२ वर्षीय विद्यार्थ्यांचा भोसकून खून करण्यात आला होता. त्यानंतर शाळेच्या आवारात चाकू, सुरीसारखी शस्त्रे आणण्याची परवानगी असावी की नसावी हा तेथे संवेदनशील विषय बनला होता. पूर्वीच्या वेपन अॅक्टनुसार सेरेमोनियल नाइफ्स आणण्यास परवानगी होती. शीख धर्मियात कृपाण हा सेरेमोनियल नाइफ प्रकारात मोडतो आणि प्रत्येक शीख धर्मिय पुरूष कृपाण अंगावर बाळगणे धर्मरिवाज मानतो. शीख कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलिया व क्वीन्सलँड अँटी डिसक्रिमिनेशन कमिशन ने या विरोधात आवाज उठविला आहे.
एज्युकेशन, ट्रेनिग अॅन्ड एम्प्लॉयमेंट विभागाचे सहाय्यक महासंचालक मार्ग पेथियागॉड यांनी केवळ शीख धर्मियांचाच विचार याबाबत करता येणार नाही. मात्र तरीही शाळेत कृपाण आणले गेले आणि ते धारदार आहे व त्याचा धमकावणे अथवा इजा करण्यासाठी उपयोग होऊ शकतो असे लक्षात आले तर प्रिन्सिपल ते जप्त करतील आणि पोलिसांत त्यासंबंधी तक्रार दाखल केली जाईल असे स्पष्ट केले आहे.
