कोट्याधीश आणि गुन्हेगार आमदारांची संख्या वाढली

अहमदाबाद दि. २५- गुजराथेत नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांत नव्याने निवडून आलेल्या आमदारांत कोट्याधीशांचे प्रमाण ७४ टक्के  तर गुन्हे दाखल असलेल्या आमदारांचे प्रमाण ३१ टक्के असल्याचे असोसिएशन ऑप डेमोक्रॅटिक रिफॉर्मने जाहीर केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की गुजराथेत १८२ आमदार आहेत. गेल्या निवडणुकांत कोट्याधीशांचे प्रमाण ३१ टक्के होते ते यंदा ७४ टक्क्यांवर गेले आहे. म्हणजे आत्ताच्या विधानसभेत १३४ आमदार कोट्याधीश आहेत. बीजेपीच्या ११५ पैकी ७५ टक्के आमदार कोट्याधीश आहेत तर र्कांग्रेसमध्ये हेच प्रमाण ७० टक्के आहे. निवडणुकांचे अर्ज भरताना उमेदवारांना जाहीर केलेल्या मालमत्तेनुसार ज्या आमदारांची मालमत्ता पाच कोटींपेक्षा अधिक आहे , त्यांच्यात विजयी होण्याचे प्रमाण ५१ टक्के आहे. दुसरीकडे ज्यांची मालमत्ता २० लाखांपर्यंत आहे त्यांचे विजयी होण्याचे प्रमाण अवघे १ टक्का आहे.

एकूण आमदारांच्या सरासरी मालमत्तेचा विचार केला तर काँग्रेस आमदारांची सरासरी मालमत्ता १२.३६ कोटी, बीजेपीच्या आमदारांची सरासरी मालमत्ता ५.८२ कोटी तर राष्ट*वादीच्या आमदारांची १५.६१ कोटी आहे. गुन्हेगारी खटले दाखल असलेल्या आमदारांची संख्या ५७ असून त्यातील २४ जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. २००७ च्या निवडणुकींतही गुन्हेगारी खटले दाखल असलेले २६ टक्के आमदार विजयी झाले होते.

Leave a Comment